Home ताज्या बातम्या मुंबईकरांनो सुट्टे पैसे ठेवा रेडी सोमवारपासून तिकीट मास्टरची टीक् टीक्

मुंबईकरांनो सुट्टे पैसे ठेवा रेडी सोमवारपासून तिकीट मास्टरची टीक् टीक्

मुंबई:- शफीक शेख

आता येत्या सोमवारी 8 जूनपासून बेस्टच्या फेऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. अर्थात या बसेसमध्ये केवळ चार ते पाच उभ्या प्रवाशांना परवानगी देण्यात येणार आहे. येत्या 10 तारखेपासून खाजगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी मिळाली असल्याने सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी बेस्टचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी 25 मार्चपासून मुंबईसह देशातील वाहतूक सेवा ठप्प झाली होती.

बेस्ट आणि एसटी महामंडळाने मात्र अत्यावश्यक घटकांसाठी आपल्या मर्यादीत फेऱ्या सुरू ठेवल्या आहेत. बेस्ट बसेसच्या चालक आणि कंडक्टर यांना ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम न पाळणाऱ्या प्रवाशांना थेट बसखाली उतरविण्याचे अधिकार प्रदान करुन बेस्ट मुंबई शहरातील अत्यावश्यक सेवा पुरवित आहे. दररोज बेस्टच्या सर्वसाधारण 1400 ते 1600 फेऱ्यांद्वारे मुंबई शहरातील डॉक्टर, नर्सेस, पोलीस, पालिका कर्मचारी वर्गाला सेवा देण्यात येत आहे. या फेऱ्या मर्यादीत असल्याने बेस्टच्या बसेसना प्रचंड गर्दी होत होती, त्यामुळे बेस्टच्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यात 15 ते 20 बेस्ट आणि वीज कामगारांचा मृत्यू झाला आहे.

आता 1 जूनपासून राज्य सरकारने लॉकडाऊन शिथील केले आहेत. 5 जूनपासून अत्यावश्यक कामासाठी टॅक्सी प्रवासाला मुभाही देण्यात आली आहे. तर 10 जूनपासून खाजगी कार्यालये कामगारांच्या 10 टक्के ‘रोटेशन’ पद्धतीने उपस्थितीत सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळेच बेस्टना ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळून प्रवाशांना सेवा पुरविणाची परवानगी देण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून बेस्ट प्रशासनाने सोमवार 8 जूनपासून पूर्वीप्रमाणेच (दररोज 3000 ते 3500) फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

राखीव बसमध्ये प्रवेश निषिद्ध

एका बसमध्ये उभ्या केवळ चार ते पाच प्रवाशांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच ‘वर्कमन्स स्पेशल’ व रुग्णालयांकरीता राखीव असलेल्या गाड्यांमध्ये सर्व सामान्य प्रवाशांना प्रवेश देण्यात येणार नाही. केवळ मार्ग क्र. 0071 मर्या. आणि शहर हद्दीतील इतर सर्व‌ बसमार्गावर सर्व प्रकारच्या प्रवाशांना येत्या सोमवारपासून प्रवेश देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

57.78% कर्मचारी कोरोनामुक्त बेस्ट उपक्रमामधील कोरोनाची लागण झालेल्या एकूण 360 कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 208 म्हणजेच 57.78% कर्मचारी कोरोनामुक्त झाले असल्याचे बेस्टचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी सांगितले.