Home ताज्या बातम्या कोरोना संशयित रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू, मृतदेह उचलण्यासाठी केला कचरागाडीचा वापर

कोरोना संशयित रुग्णाचा रस्त्यावर मृत्यू, मृतदेह उचलण्यासाठी केला कचरागाडीचा वापर

लखनऊ :कोरोना संशयित व्यक्तीचा रस्त्यावरच मृत्यू झाल्यानं मृतदेह उचलण्यासाठी कचरागाडीचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये उघडकीस आला आहे. लखनऊपासून 160 किलोमीटर अंतरावर बलरामपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. माहितीनुसार बलरामपूर जिल्ह्यातील उतरौला तहसीलमध्ये मोहम्मद अन्वर नावाचा एक 42 वर्षीय व्यक्ती काही कामानिमित्त आला होता. त्यानंतर अन्वरला छातीत वेदना होऊ लागल्यानं तो गेटबाहेर येत असतांना अचानक पडला. गेटजवळ उपस्थित काही लोकांनी पोलिसांना आणि रुग्णवाहिकांना या घटनेची माहिती दिली. दरम्यान माहिती मिळताच तेथे एक रुग्णवाहिकाही आली आणि पोलिसही आले पण कोणीही अन्वरला उचलण्यासाठी तयार नव्हते. त्यामुळं अन्वरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काही वेळानंतर पोलिसांनी मृतदेहाला रुग्णालयात दाखल न करता थेट कचरागाडीला फोन केला. त्यानंतर घटनास्थळी महापालिकेची कचरागाडी दाखल झाली आणि अन्वरच्या मृतदेहाला कचरागाडीतून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.

दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं वापरकर्त्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. पोलिसांनी याबाबत बोलतांना असं सांगितलं आहे की कोरोनामुळं मृत्यू झाला या भीतीनं रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेहाला स्पर्श करण्यास नकार दिला होता. याप्रकरणातील तपास आता सीओ आणि एसडीएमकडे सोपविण्यात आला असून संकटकाळात जबाबदारी झटकून पळ काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येणार असल्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.