श्रावणातली सिद्धेश्वरांची यात्रा स्थगित

- Advertisement -

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । १३ जुलै : लॉकडाऊन काळात मंदिरांची दारे भाविकांसाठी बंद आहेत. याच पार्श्वभुमीवर उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सिद्धेश्वर) येथील सिध्देश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारची यात्रा स्थगित करण्याचा निर्णय संबंधित मंदिर संस्थानाने घेतला आहे.
तालुक्यातील वडगाव (सि.) येथील डोंगरामध्ये सिध्देश्वर मंदिर आहे. संस्थानाच्या म्हणण्यानुसार ते प्राचीन व जागृत देवस्थान आहे. श्रावण महिन्यात मंदिर व परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो. त्याचा आस्वाद घेण्यासाठी येथे भाविकांची गर्दी असते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे मोठी यात्रा भरते.
मात्र सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धार्मिक स्थळे बंद व यात्रा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या सूचनेप्रमाणे वडगाव (सि) येथील सिध्देश्वराची श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भरणारी यात्रा मंदिर संस्थनच्या वतीने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात केवळ मंदिर संस्थानच्या वतीने धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. इतर कोणत्याही भाविकास मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही.  भाविक भक्तांनी याची दखल घ्यावी असे आवाहन श्री. सिध्देश्वर मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -