Home ताज्या बातम्या कोरोनाबाधित पोलिस व त्यांच्या कुटुंबियांला छळणाऱ्या “त्या”तिघांवर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे कारवाईचे आदेश

कोरोनाबाधित पोलिस व त्यांच्या कुटुंबियांला छळणाऱ्या “त्या”तिघांवर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे कारवाईचे आदेश

भिलार (जि.सातारा) : वाई पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका कोरोनाबाधित पोलिस व त्यांच्या कुटुंबाला पाचवड येथील घरी विलगीकरण करण्यास तीन जणांनी मज्जाव केला आहे. याबाबत आपले सरकार पोर्टलवर लेखी तक्रार दाखल केली असून, कारवाईची मागणी केली. त्याची दखल घेत पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. वाई पोलिस ठाण्यातील नऊ पोलिस कर्मचारी बाधित झाल्याने जिल्हा पोलिस दलात खळबळ माजली होती.

स्वतःपोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कोरोना कक्षात जाऊन बाधित पोलिसांच्या प्रकृतीची गेल्या आठवड्यात चौकशी केली होती. यातील एका पोलिस कर्मचाऱ्याला व त्याची पत्नी व चार वर्षाच्या मुलीला उपचार करून 22 जुलै रोजी रात्री बारा वाजता पाचवड येथील गणेश कॉलनी येथील राहत्या इमारतीनजीक सोडले. रुग्णवाहिका निघून गेली. त्यानंतर इमारतीच्या गेटला कुलूप असल्याचे पाहून त्यांनी गेट उघडण्याची विनंती केली. पण,20 मिनिटे त्यांना ताटकळत ठेवले. नंतर कुलूप काढून त्यांना प्रवेश दिला.दुसऱ्या दिवशी सकाळी पाचवड येथील गणेश कॉलनी येथे जाऊन तिघांनी संबंधित पोलिस व त्याची पत्नी, मुलगी यांना हीन वागणूक दिली. त्यांची चार ऑगस्टला विलगीकरणाची मुदत संपणार आहे. दरम्यान मारहाणीची धमकी दिल्याची लेखी तक्रार तीन दिवसांनी आपले सरकार पोर्टलवर संबंधित पोलिसाने दिली आहे. या तिघांवर कडक कारवाईचे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आदेश दिले. यापूर्वीही पाचवड येथील एका ग्रामस्थाला गावात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्याने आत्महत्येची धमकी दिल्यानंतर प्रकरण मिटविण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे.जावळी तालुक्‍यातील तरुण पोलिस वाई पोलिस ठाण्यात कार्यरत होण्यापूर्वी मुंबई येथे स्पेशल फोर्स कमांडो म्हणून तीन वर्षे सेवा केली होती. त्यांना विशेष सेवापदकही मिळाले आहे. जिल्ह्यातील ते पहिले कमांडो असताना त्यांना अशी वागणूक मिळाल्याने मानसिक धक्का बसला आहे.