Home शहरे बीड शाळेत दारूच्या बाटल्यांसह कंडोमचा दोन पोती कचरा आढळल्याने खळबळ

शाळेत दारूच्या बाटल्यांसह कंडोमचा दोन पोती कचरा आढळल्याने खळबळ

अंबाजोगाई (जि. बीङ) : येथील मंडी बाजार भागात असलेल्या जिल्हा परिषद मुलींच्या शाळा परिसरात सोमवारी दोन पोती दारूच्या बाटल्या आणि कंडोमचा कचरा आढळल्याने खळबळ उडाली आहे. टारगट मुलांनी वा तळीरामांनी हा उपद्रव केला असावा, अशी शक्यता मुख्याध्यापकांनी वर्तविली. यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.  

४५ दिवसांच्या उन्हाळी सुट्यानंतर १७ जून रोजी शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. येथील मंडी बाजार भागात असलेल्या जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असून जवळपास ३५० पटसंख्या आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी शिक्षकांनी परिसरात स्वच्छता केली असता त्यांना दारूच्या बाटल्यांचा खच आणि कंडोमचा कचरा दिसून आला. हा कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. शाळेच्या परिसरात अशा प्रकारचा कचरा आढळून आल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. शाळेला सुरक्षा भिंत आहे. मात्र तिची उंची कमी असल्याने त्यावर चढून किंवा बाहेरून परिसरात हा कचरा फेकला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.  या शाळेजवळच भाजीमंडई व इतर गजबजलेला परिसर आहे. हा बाजार परिसर रात्री मोकळा असतो.

पोलीस प्रशासनांची मदत घेणार 
शाळा व परिसराची वारंवार स्वच्छता केली जाते. यापुढेही काळजी घेतली जाईल. शाळेजवळच्या परिसरातील टारगट मुलांचा सातत्याने उपद्रव असतो. सुटीमुळे शाळा परिसरात कोणी नसल्याने टारगट व तळीरामांनी हा प्रकार केला असावा. अशा लोकांचा उपद्रव टाळण्यासाठी त्यांचा बंदोबस्त करावा म्हणून आता पोलीस प्रशासनाची मदत घेणार आहे.