Home ताज्या बातम्या शांततेचा संदेश देत ती धावतेय काश्मीर ते कन्याकुमारी….

शांततेचा संदेश देत ती धावतेय काश्मीर ते कन्याकुमारी….

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या भारताच्या विविध प्रांतात एकात्मतेचा शांततेचा संदेश देत ३३ वर्षीय सुफीया खान धावते आहे. लोकांची भेट घेत आहे, त्यांच्याशी चर्चा करीत आहे. राजस्थानमधील अजमेर शहरातील सुफीया खान हि देशातील २२ शहरातून तिची रन फॉर होप मॅरेथॉन दौड करीत आहे. १०० दिवसात तिला ४०३५ किमी अंतर कापायचे आहे. काश्मीरमधून सुरू झालेला तिचा प्रवास आता महाराष्ट्रातून सुरू असून ठाण्यात तिचे आगमन झाले त्यावेळी ठाणेकर नागरीकांनी तिचे स्वागत केले. ठाण्यातील कोरम मॉलमध्ये सुफीयाने भेट देऊन नागरिकांशी व पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते सुफीया खान हिचा सत्कार करण्यात आला.

मी पूर्वी कोणताही व्यायाम वगैरे असा काही करीत नव्हते. एव्हियेशन क्षेत्रात असल्याने कामाची वेळ सारखी बदलत असायची त्यामुळे व्यायामाला असा वेळ मिळत नव्हता, मग मी वेळ मिळेल तेव्हा धावायला  जायची. रनिंगने मला शारीरीक व मानसिक बळ दिले. मी नंतर अनेक स्पर्धातूनही भाग घेऊ लागली असे सुफीया खान यानी सांगितले.

 सुफीया खान यानी दिल्ली-जयपूर-आग्रा-दिल्ली ही ७२० किमीची ग्रेट इंडियन गोल्डन ट्रँगल ही स्पर्धा १६ दिवसात पूर्ण केली. ही स्पर्धा सर्वात जास्त कमी वेळात पूर्ण करणारी पहिली महिला म्हणून त्याना गौरवण्यात आले. इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये देखील या विक्रमाची नोंद घेण्यात आली आहे. त्यानंतर मात्र नोकरीपेक्षा रनिंगवरच ध्यान देण्याचा निर्धार त्यानी केला आणि नोकरी सोडली.

भारत विविध धर्माचे, पंथाचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. देशाच्या विकासासाठी सगळ्यानी जात धर्म बाजूला ठेऊन पुढे यायला हवे, देशात शांतता हवी. तरच विकास होऊ शकेल हा संदेश भारतीयांपर्यंत पोचावा यासाठी त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा मी निर्णय घेतला आणि काश्मीर ते कन्याकुमारी ही भारताची दोन्ही टोक धावून पूर्ण करण्याच्या मोहिमेला लागले, असे सुफीया खान पुढे म्हणाल्या. लोकांचा चांगला प्रतिसाद शहरातून, गावातून मिळतो आहे. महाराष्ट्रातून पुढे दक्षिण भारताकडे आपण वाटचाल करणार असल्याचे त्यानी सांगितले. दिवसाला साधारणत ५० किमीचे अंतर आपण पार पाडतो असे त्यानी सांगितले. त्यांच्या सोबत त्यांचे पती विकास देखील आहेत. विकास यांनी काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर १० दिवसात सायकलवरून पार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. माझे पती हे माझे प्रेरणास्थान असल्याचे सुफीया खान यानी सांगितले. ठाण्यातील त्यांचा प्रवासाचा त्यांचा ३५ वा दिवस होता. २१ एप्रिल २०१९ ला श्रीनगर-काश्मीर येथून त्यानी रन फॉर होपला सुरूवात केली होती. मुंबईला जाऊन दक्षिण भारताकडे त्यांची वाटचाल आता सुरू झाली आहे.