Home गुन्हा ‘वाँटेड’ गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला ; २ पोलीस कर्मचारी जखमी

‘वाँटेड’ गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला ; २ पोलीस कर्मचारी जखमी

लातूर : फरार आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करण्यात आल्याची घटना लातूर मध्ये घडली आहे. या घटनेत चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना लातूर शहरातील बुऱ्हाणनगर भागात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. जखमी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर लातूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सहा जणांना विवेकानंद चौक पोलीसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मागील अनेक दिवसांपासून फरार असलेल्या गुन्हेगाराच्या शोधात होते. शहरातील बुऱ्हाणनगर परिसरात फरार आरोपीच्या भावाचे लग्न होते. भावाच्या लग्नात तो आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रकाश भोसले, युसुफ शेख, रामहरी भोसले व अन्य कर्मचारी बुऱ्हाणनगर येथे असलेल्या लग्नाच्या ठिकाणी गेले. त्यावळी पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता. वऱ्हाडी मंडळीतील काही लोकांनी पोलिसांना विरोध केला. पोलीस ऐकत नसल्याचे पाहून वऱ्हाडी मंडळींनी पोलिसांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावाकडून पोलिसांना बेदम मारहाण केली.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उप अधीक्षक सचिन सांगळे यांच्यासह विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या जमावातील सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.