Home अश्रेणीबद्ध पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या स्मृतिचित्रे स्मरणिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या स्मृतिचित्रे स्मरणिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना लवकरच सन्मान योजनेचा लाभ

                                                                                                –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

           पुणे : पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य सरकार नेहमीच सकारात्मक असून ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेसाठी 25 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून पुढच्या महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्यात अर्ज केलेल्या पत्रकारांना याचा लाभ मिळेल ,अशी ग्वाही देतानाच  म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून पुण्यातील पत्रकारांसाठी घरे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. तसेच पुणे प्रेस क्लबसाठीही जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            येथील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात पुणे पत्रकार संघाच्या सन 1940 ते 2019 या आठ दशकांचा चित्रमय प्रवास असणाऱ्या “स्मृतिचित्रे” या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, आमदार जगदीश मुळीक, मेधा कुलकर्णी, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस  पांडुरंग सांडभोर उपस्थित होते. 

             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या देशात अनेक संस्था निर्माण झाल्या, त्या मोठ्या झाल्या .मात्र त्याच्या इतिहासाचे जतन करण्याचे काम आपल्याकडे फारसे झाले नाही. परदेशात मात्र संस्थांच्या इतिहासाचे योग्य प्रकारे जतन करण्यात येते. संघर्षाच्या काळात तसेच पुढील पिढीसाठी हा ऐतिहासिक दस्ताऐवज उपयुक्त ठरतो. पुणे श्रमिक पत्रकार संघाला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा ऐतिहासिक वारसा आहे. हा सर्व इतिहास संग्रहीत करून तो चित्ररूपाने प्रदर्शीत करण्याचा पत्रकार संघाचा हा उपक्रम अभिनव आहे.

               पत्रकारिता व्यवसायासमोर आज अनेक अडचणी  आहेत, त्यातच नवमाध्यमांच्या उदयाने हे क्षेत्र अधिकच आव्हानात्मक बनले आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांच्या कल्याणासाठी त्यांचा समावेश शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये करण्यात आला आहे. याचा लाभ राज्यातील पत्रकारांना होणार असल्याचे सांगत पत्रकारितेला अधिक प्रगल्भ करण्यासाठी पत्रकार संघाने पुढाकार घेवून विशेष अभ्यासदौरे आणि अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी केले. 

               खासदार गिरीश बापट म्हणाले, पुणे श्रमिक पत्रकार संघाचा पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठा वाटा आहे. पत्रकार हा लोकशाहीचा आधार आहे. समाजाच्या दु:खाला न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकार करत असतात. पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इतिहास आदर्शवत असून पुणे प्रेस क्लबच्या उभारणीत शहरातील सर्व लोकप्रतिनिधी सक्रीय सहभाग नोंदवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 े

आषाढी वारी 2019 मार्गदर्शिकेचे प्रकाशन

             पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आणि नागरिकांना वारीच्या संदर्भात अद्ययावत माहिती मिळावी, महत्वाचे फोन नंबर उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हा  प्रशासनाने तयार केलेल्या “आषाढी वारी 2019” या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.   

            कार्यक्रमाचे स्वागत पांडुरंग सांडभोर यांनी केले. प्रस्तावना राजेंद्र पाटील यांनी केली. सुत्रसंचालन प्रशांत आहेर यांनी केले. तर आभार चंद्रकांत हंचाटे यांनी मानले. या कार्यक्रमाला पुणे शहर आणि परिसरातील ज्येष्ठ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.