Home अश्रेणीबद्ध डम्बेल्सचे नट काढले म्हणून केली सहकाऱ्याची हत्या

डम्बेल्सचे नट काढले म्हणून केली सहकाऱ्याची हत्या

मुंबई : डम्बेल्सचे नट काढल्याच्या रागात मुलुंड मर्डर मिस्ट्रीतील आरोपी योगेश राणे याने सहका-याची हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली. हत्येनंतर तो हॉटेलच्या रूमवर गेला. काहीच न झाल्याचे दाखवून त्याने पाच महिने दिनक्रम सुरू ठेवला.

मूळचा रायगडचा असलेला राणे आईसह राहतो. २०१२ मध्ये जादूटोणा केल्याच्या संशयातून त्याने शारदा राऊत (५०) हिची हत्या केली. या प्रकरणी ३ वर्षे तो कैदेत होता. तेथून बाहेर पडल्यानंतर नोकरीच्या शोधात त्याने मुंबई गाठली. विश्वभारती हॉटेलमध्ये त्याला नोकरी मिळाली.

तेथेच विजयकुमार यादव, नवाज नेपाळीही नोकरीला होता. त्याने व्यायामासाठी आॅनलाइन डम्बेल्स मागविले. तेथे सर्वांसमोर तो व्यायाम करत असे. विजयकुमारही त्याच्या डम्बेल्सला हात लावत असे. मात्र, ते जागेवर ठेवत नसल्याने राणेला राग आला. त्याने यादवला डम्बेल्सला हात न लावण्यास सांगितले. याच रागात यादवने डम्बेल्सचे नट काढले. त्यामुळे यादवला धडा शिकविण्यासाठी त्याने २६ जानेवारीच्या रात्री यादवला जेवण, दारूपार्टीसाठी नेले. केळकर कॉलेजमागील झुडपातच पार्टीनंतर जवळील हातोडीने त्याची हत्या केली. ओळख पटू नये म्हणून रॉकेलने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.
हत्येनंतर तो पुन्हा हॉटेलच्या रूमवर निघून गेला.

दुस-या दिवसापासून त्याने नियमित दिनक्रम सुरू ठेवला. दुसरीकडे यादव हा गावी निघून गेल्याच्या शक्यतेतून हॉटेल व्यवस्थापनानेही दुर्लक्ष केले होते. २७ जानेवारीला अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. त्यानुसार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी प्रताप भोसले, दीपाली कुलकर्णी, भरत जाधव, माने यांनी तपास सुरू केला. राणेने घटनास्थळावर नेपाळीच्या हत्येचा प्रयत्न केला व तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्या चौकशीतून वरील घटनाक्रम उघड झाला. त्याला न्यायालयाने १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तापट स्वभावातून त्याने आणखी हत्या केल्याचा संशय पथकाला आहे. हत्येसाठी वापरलेली हातोडी पोलिसांनी हस्तगत केली आहे.