Home बातम्या राजकारण अमित शहांचा जम्मू काश्मीर दौरा; 30 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं की…

अमित शहांचा जम्मू काश्मीर दौरा; 30 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं की…

जम्मू : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या दोन दिवसाच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांनी बंद पुकारला नाही असं घडलं आहे. मागील तीन दशकात काश्मीरमध्ये कोणत्याही गृहमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी दहशतवाद्यांकडून बंद पुकारण्याचं आवाहन केलं गेलं नाही. गृहमंत्री झाल्यानंतर अमित शहा श्रीनगर येथे पोहचले. या दौऱ्यावेळी अमित शहा यांनी सुरक्षा आणि विकास या दोन्ही मुद्द्यावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

दौऱ्यादरम्यान अमित शहा यांच्याकडून अमरनाथ यात्रादेखील करण्यात येणार आहे. काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकी, लोकप्रतिनिधी आणि पंचायत सदस्यांसोबतही त्यांची बैठक होणार आहे. तसेच राज्यपाल सत्यपाल मलिक यांचीदेखील ते भेट घेणार आहेत. 
सुरक्षेच्या मुद्द्यावरुन घेतलेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनाला दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई सुरुच ठेवण्याचे आदेश दिले. तसेत अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवादी घातपात कारवाया करण्याची शक्यता असल्याने योग्य तो पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी लावण्यात यावी अशा सूचना शहा यांनी सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

शहा यांच्या दौऱ्याचं विशेष म्हणजे फुटिरतावादी नेत्यांकडून बुधवारी कोणत्याही प्रकारे बंद पुकारला गेला नाही. हुर्रियत कॉन्फेरन्सच्या सैय्यद अली शाह गिलानी असो वा मीरवाईज उमर फारुक कोणत्याही संघटनांकडून बंदचं आवाहन करण्यात आलं नाही. तसेच दहशतवादीसंघटनांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मागील तीन दशकांपासून केंद्र सरकारमधील कोणीही प्रतिनिधी जम्मू काश्मीर दौऱ्यावर आल्यानंतर फुटिरतावादी गटांकडून काश्मीर खोऱ्यात बंद पुकारण्यात येत होता.

3 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर खोऱ्यात दौरा केला. त्यावेळी गिलानी, मीरवाइज आणि जेकेएलएफचा मुख्य यासीन मलिक यांच्या संघटनेकडून बंद पुकारण्यात आला. तर 10 सप्टेंबर 2017 रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून काश्मीर दौरा करण्यात आला. तेव्हाही जेआरएल या संघटनेकडून काश्मीर खोऱ्यात बंद पुकारण्यात आला होता. मात्र अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी असं काहीच घडलं नाही.