हायलाइट्स:
- पश्चिम बंगालमधील निवडणूक मतमोजणी सुरू
- सुरुवातीचे कल होती, तृणमूल काँग्रेस आघाडीवर
- प्रशांत किशोर यांची ती भविष्यवाणी खरी ठरण्याची शक्यता
- प्रशांत किशोर यांनी भाजपबाबत केला होता महत्वाचा दावा
२९ एप्रिल रोजी अखेरच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले. त्यात भाजपला शंभरहून अधिक जागांवर विजय मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली होती. तर प्रशांत किशोर यांनी केलेल्या भविष्यवाणीचे काय, असा प्रश्न होता. भाजपने शंभरहून अधिक जागा जिंकल्या तर, ते आपला पेशा सोडून देतील आणि दुसरे काहीतरी काम करतील, असे म्हणाले होते.
पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीच्या निकालांमध्ये तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळते असल्याचे दिसते. टीएमसी १९१ जागांवर आघाडीवर असून, भाजप १०० जागांच्या जवळपास पोहोचला आहे. आतापर्यंतचे कल बघता नंदीग्राम मतदारसंघ आणि प्रशांत किशोर यांचीच अधिक चर्चा होत आहे. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी चौथ्या फेरीतील मतमोजणीत पिछाडीवर आहेत. भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी हे आघाडीवर आहेत. दुसरीकडे प्रशांत किशोर यांनी भाजपसंबंधी केलेल्या दाव्याबाबतही चर्चा आहे.
बंगालमध्ये भाजपच्या सेंच्युरीकडे सर्वांची नजर
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत भाजप ९३ जागांवर आघाडीवर आहे. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा भाजप ११५ जागांवर आघाडीवर होता. त्यावेळी प्रशांत किशोर आता काय करणार यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. आतापर्यंतचे कल बघता भाजप १०० पेक्षा कमी जागांवर आघाडीवर आहे. अद्याप अनेक फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे. संपूर्ण निकाल अजून हाती यायचा आहे. तोपर्यंत प्रशांत किशोर आणि त्यांनी केलेल्या भाजपसंबंधी दाव्याची चर्चा होतच राहणार.