हायलाइट्स:
- ममता बॅनर्जींनी भाजपला लोळवल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया.
- ‘संघर्षाची परिसीमा गाठत यश मिळवलं’, राज ठाकरेंकडून ममतादीदींवर स्तुतीसुमने.
- राज ठाकरेंनी महाराष्ट्र आणि बंगालमधील समानताही सांगितली.
‘पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या लक्षणीय यशासाठी ममता बॅनर्जींचं अत्यंत मनापासून अभिनंदन. संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि या निवडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवलं,’ असं म्हणत राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
महाराष्ट्र आणि बंगालमध्ये कोणती समानता?
ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन करताना राज ठाकरे यांनी त्यांच्याकडे एक अपेक्षाही व्यक्त केली आहे. ‘कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खूप मोठी परंपरा, या बाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यांच्यात खूपच समानता आहे, आणि त्यामुळेच राज्यांची स्वायत्तता आणि प्रांतिक अस्मिता याचं महत्व तुम्ही नक्कीच समजू शकता. राज्यांच्या स्वायत्ततेसाठीचा आग्रही आवाज तुम्ही बनाल आणि सर्वसमावेशक भूमिका घेत पश्चिम बंगालचा विकास साधाल अशी आशा मी व्यक्त करतो. तुम्हाला मिळालेल्या यशासाठी तुमचं आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांनी बंगालची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:देखील भाजपच्या विजयासाठी निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरले होते. त्यामुळे या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार, याची देशभरात उत्सुकता होती. मात्र, ममता बॅनर्जी यांनी २०० हून अधिक जागांवर आघाडी मिळत ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल केली आहे.