Home शहरे पुणे पुण्यात लसीकरण ‘या’ कारणामुळे दोन दिवस बंद राहण्याची शक्यता

पुण्यात लसीकरण ‘या’ कारणामुळे दोन दिवस बंद राहण्याची शक्यता

0
पुण्यात लसीकरण ‘या’ कारणामुळे दोन दिवस बंद राहण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेला नव्याने लशींचा पुरवठा न झाल्याने ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण पुढील दोन दिवस बंदच राहण्याची शक्यता आहे, तर कमला नेहरू रुग्णालय व राजीव गांधी रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे पूर्वनोंदणीनुसार लसीकरण करण्यात येणार आहे.

शहरात आज, सोमवारीही केवळ दोनच लसीकरण केंद्रे सुरू राहणार असून, नागरिकांनी लस घेण्यासाठी इतर केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, १८ ते ४४ वयोगटात शनिवारी (१ मे) १३२, तर रविवारी (२ मे) ३८० नागरिकांना लस देण्यात आली. राज्य सरकारने शुक्रवारी रात्री लसीकरणाबाबत नवीन आदेश दिले होते. पुण्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू व्हावे, यासाठी पाच हजार डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. कमला नेहरू रुग्णालय आणि येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येत आहे.

पुढील पाच दिवस हे डोस वापरण्यात येणार असल्याने दर दिवशी एका केंद्रावर केवळ ३५० व्यक्तींचे लसीकरण होणार आहे. ज्यांनी यापूर्वीच ‘कोविन-अॅप’वर नोंदणी केली आहे आणि ज्यांना या दोन केंद्रांवरील लसीकरणाची ‘अपॉइंटमेट’ मिळाली आहे, त्यांनाच पहिला डोस देण्यात येणार आहे. लसीकरण केंद्रांवर येऊन अपॉइंटमेंट घेणाऱ्या (वॉक इन) नागरिकांना लस देण्यात येणार नाही, असे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

लशीबरोबर बाकरवडीही

लसीकरणानंतर नागरिकांना चितळे बंधू मिठाईवाले यांच्यातर्फे बाकरवडीचा मिनी पॅक दिला जात होता. पहिल्याच दिवशी लस मिळाल्याबद्दल पुष्कर गोखले, प्राजक्ता मिराशी आदींनी आनंद व्यक्त केला.

डॉक्टर, नागरिकांत वाद

शनिवारी (१ मे) १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यास प्रारंभ झाला. यासाठी ‘कोविन अॅप’वरून नोंदणी केलेल्या आणि अपॉइंटमेंट मिळालेल्या व अपॉइंटमेंट न मिळालेल्या नागरिकांनीही गर्दी केली होती. कमला नेहरू रुग्णालयात अपॉइंटमेंट मिळालेल्या नागरिकांची यादी लावली होती. त्यात नाव नसलेले नागरिक आणि प्रशासन यांच्यात वादविवाद झाले. सुरक्षित अंतर राखण्याविषयी प्रशासनाला वारंवार विनंती करावी लागत होती. ‘तांत्रिक समस्यांबाबत आम्ही काहीही करू शकत नाही,’ असा दावा डॉक्टर्स करत होते, तर ‘११ वाजण्यापूर्वीच पात्र नागरिकांची यादी कशी प्रसिद्ध झाली,’ यावरून नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले. शेवटी या ठिकाणी पोलिस व सुरक्षारक्षक बोलावून नागरिकांना आत सोडण्यात आले.

दोन दिवसांत ५१२ जणांचे लसीकरण

– महापालिकेने दररोज ७०० नागरिकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले असले, तरी एका लसीकरण केंद्रावर ऑनलाइन अपॉइंटमेंट केवळ १०० व्यक्तींनाच मिळते. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे.

– शनिवारी एक मे रोजी १८ ते ४४ वयोगटातील केवळ ४६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. इतर व्यक्तींचे लसीकरण मिळून हा आकडा १३२ आहे.

– रविवारी १८ ते ४४ वयोगटातील ३८० नागरिकांचे लसीकरण झाल्यामुळे दोन दिवसांत ५१२ जणांना लस दिली गेली.

– महापालिकेकडील पाच हजार डोसपैकी सुमारे साडेपाचशे डोस वापरले गेले आहेत. त्यामुळे येत्या दिवसांत महापालिकेला लस उपलब्ध झाली नाही, तर लसीकरण ठप्प होणार आहे.

Source link