करोना संसर्गामध्ये शरिरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवरही घाला येतो, तसेच इतर शारिरिक गुंतागुंत निर्माण झाल्यास आयसीयूमध्ये रुग्णांना दाखल करण्याची वेळ येते. या सव्वा वर्षाच्या कालावधीमध्ये आयसीयू तज्ज्ञांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात नसल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. प्रत्यक्षात कोविडमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते आयसीयूमध्ये काम करण्यासाठी अनेक तरुण डॉक्टरांची मानसिकता अद्याप तयार झालेली नाही. रुग्णांची अवस्था अधिक बिकट होऊन त्याचे प्राण गेले तर ते जाहीर करणे, रुग्णाला व्हेंटिलेटर लावणे तसेच इतर आप्तकालीन परिस्थितीमध्ये निर्णय घेण्याचा ताणामुळे डॉक्टरांचा या क्षेत्राकडे वळण्याचा कल कमी आहे. राज्यात तसेच मुंबईमध्ये आयसीयूमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांचा करोना काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा जाणवला.
पालिका रुग्णालयामध्ये रुग्णसेवेसोबत वैद्यकीय शिक्षणाचीही जबाबदारी सांभाळावी लागते, कोविड आणि नॉन कोविड अशा दोन्ही पातळ्यांवर रुग्णालय प्रशासन काम करत आहे. पहिल्या लाटेच्या वेळी करोनाच्या संसर्गाची क्षमता कमी होती. त्यामुळे नायर रुग्णालयासारख्या रुग्णालयाचे काही महिन्यांनंतर पुन्हा नॉन कोविड रुग्णालयामध्ये रूपांतर करण्यात आले होते. कोविड नसलेल्या रुग्णांसाठी ओपीडी तसेच इतर वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी रुग्णालय प्रशासन सातत्याने प्रयत्नशील राहते, असे पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.
करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये करोना संसर्गाचे प्रमाण वाढायला लागल्यानंतर या सेवामध्ये खंड पडला. अनेक विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वैद्यकीय वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये सर्जरीचे प्रशिक्षण व्यवस्थितपणे घेता आलेले नाही, आयसीयू व्यवस्थापनाचा अनुभव व कौशल्ये ज्ञात असलेल्या डॉक्टरांची संख्या मर्यादित आहे मात्र त्याचवेळी रुग्णसंख्येचा ताण वाढता आहे, त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांना सरसकट नव्या जंबो सेंटर्समध्ये ड्युटी लावणे शक्य होणार नाही. त्यामुळे पालिका रुग्णालयांवरचा ताण वाढेल तसेच इतके मनुष्यबळ नव्या सेंटर्ससाठी उपलब्ध नाही. त्यामुळे या सेंटर्मध्ये खासगी संस्थांच्या मदतीने आऊटसोर्स करण्याचा विचार सुरु असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.