करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरातील अनेक सोसायट्या, इमारती प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांना अशा ठिकाणी जाऊन मिटर रिडींग घेणे शक्य होत नाही. त्या पार्श्वभूमीवर ‘महावितरण’ने मोबाइल अॅप व संकेतस्थळावरून मीटर रिडींग पाठविण्याची सुविधा वीज ग्राहकांना दिली आहे. त्यामध्ये आता ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडींग पाठविण्याचा पर्यायही ‘महावितरण’ने उपलब्ध करून दिला आहे.
दर महिन्याच्या एक ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीज जोडणी मीटरचे फोटो रिडींग घेतले जाते. ग्राहकांच्या वीजबिलावर ही तारीख व मीटर क्रमांक नमूद आहे. या तारखेच्या एक दिवस आधी ‘महावितरण’कडून ग्राहकांना ‘एसएमएस’ पाठवून स्वतःहून रिडींग पाठविण्याची विनंती केली जाते. हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाइल अॅप, ‘महावितरण’चे संकेतस्थळ किंवा ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडींग पाठविता येईल. ही सुविधा केवळ करोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीत उपलब्ध राहणार असल्याचे ‘महावितरण’ने कळविले आहे.
असे पाठवा ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडींग
– ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडींग पाठविण्यासाठी संबंधित मोबाइल क्रमांक ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी करणे आवश्यक आहे.
– वीज ग्राहकांनी MREAD (स्पेस) १२ अंकी ग्राहक क्रमांक (स्पेस) मीटरचे KWH रिडींग असा ‘एसएमएस’ ९९३०३९९३०३ या मोबाइल क्रमांकावर पाठवावा.