हायलाइट्स:
- रुपाली चाकणकर यांची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका.
- चंद्रकांत पाटलांना गावातील ग्रामपंचायतही निवडून आणला न आल्याचा लगावला टोला.
- भुजबळांवरील टीकेला दिलं जोरदार उत्तर.
‘चंद्रकांतदादा पाटील, कोल्हापूर पूर परिस्थितीत आपण केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे आपल्याला आपला मतदारसंघ सोडून आमच्या पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदार संघ निवडावा लागला. सुज्ञास फार न सांगण्यास लागे,’ असं म्हणत रूपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.
चंद्रकांत पाटलांनी छगन भुजबळांवरील आरोपांविरोधात पुन्हा कोर्टात जाण्याचा इशारा दिल्यानंतर रुपाली चाकणकर म्हणाल्या की, ‘राज्यात भाजपची सत्ता असताना जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबै बँक घोटाळा असे अनेक प्रकार घडले आहेत. या घोटाळ्यांची चौकशी अजून बाकी आहे.’
चंद्रकांत पाटील नक्की काय म्हणाले होते?
‘भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आता ढासळत चालली आहे, हेच बंगालच्या निकालानंतर स्पष्ट होतं,’ अशी टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली होती. ही टीका जिव्हारी लागलेल्या चंद्रकांत पाटलांनी भुजबळांवर वैयक्तिक हल्ला चढवला. ‘तुम्ही जेलमध्ये असताना तुमचा पुतण्या दररोज माझ्या घरी येऊन बसत होता आणि जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करा, अशी विनंती करत होता. अजूनही तुम्ही जामिनावर बाहेर आहात…निर्दोष झालेला नाहीत, याची जाणीव ठेवा,’ असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला होता.