यंदा पावसाळ्यात मुंबई थांबणार नाही; ‘हे’ आहे कारण

यंदा पावसाळ्यात मुंबई थांबणार नाही; ‘हे’ आहे कारण
- Advertisement -


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने ‘यूएसए’ पॅटर्नवर जोर दिला आहे. मुंबई लोकल रुळांवरील पाणी भरण्याच्या अतिसंवेदनशील ठिकाणी मायक्रो टनेलिंगचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. यामुळे सँडहर्स्ट रोडसह विद्याविहार-कुर्ला, चुनाभट्टी-टिळकनगर आणि वांद्रे-खार विभागातील रेल्वे रुळांवर पाणी साचून राहाणार नाही, असा विश्वास व्यक्त होत आहे.

अमेरिकेने ही समस्या सोडवण्यासाठी १९८४मध्ये सर्वप्रथम मायक्रो टनेलिंगचा प्रकल्प राबवला होता. भूमिगत वाहिनीद्वारे साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग खुला करणे या पद्धतीवर हे काम केले जाते. सॅडहर्स्ट रोड स्थानकात सर्वात लांब मायक्रो टनेलिंगचे काम मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात आले आहे. १.८ मीटर व्यासाची आणि ४०० मीटर लांबीची नवी भूमिगत वाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरू आहे.

सॅंडहर्स्ट रोड-मशिद स्थानक परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कल्व्हर्ट नसल्याने वापरात असलेल्या नाल्यांमधून पाण्याचा प्रवाह वळवला जात असे. परंतु मुसळधार पाऊस पडल्यास या स्थानकांत पूरस्थिती निर्माण होत होती. ‘मशीद स्थानकात नवीन कल्व्हर्ट उभारण्यात येत असून या ठिकाणी १ मीटर व्यास आणि ७० मीटर लांबीची वाहिनी टाकण्यात येत आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल.

पाणीउपसा करणारे पंप वाढवले

कुर्ला-विद्याविहार, टिळकनगर-चुनाभट्टी या स्थानकांदरम्यान कल्व्हर्ट, नाले साफसफाईचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. या भागांतील मायक्रो टनेलिंगचे काम पूर्ण झाले आहे. रुळांवर तसेच ओव्हरहेड वायरवर येणाऱ्या झाडांमुळे, फांद्यामुळे आग लागण्याच्या घटना घडतात. या रोखण्यासाठी झाडांची छाटणी सुरू आहे. गेल्या वर्षी एक हजार झाडांची छाटणी करण्यात आली होती. पाणीउपसा करणाऱ्या पंपांच्या संख्येत यंदा १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.



Source link

- Advertisement -