डीआरटीने गोठविलीमनपाची बँक खाती

- Advertisement -

जळगाव:

जळगाव महापालिकेवर असलेल्या हुडकोच्या थकीत कर्जासाठी डीआरटी कोर्टाच्या आदेशाने महापालिकेची सर्व बँक खाती गोठविण्यात आली आहेत. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला असला, तरी प्रशासन मात्र, मूग गिळून बसले आहे.

घरकुलसह विविध योजनांसाठी मनपाने १४१ कोटी ३४ लाखांचे मनपाकडून कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते थकल्यामुळे हुडकोने डीआरटीत धाव घेतली. याप्रकरणी डीआरटीने ३४१ कोटींची डिक्री नोटीस मनपाला बजावली. तसेच सप्टेंबर २०१४ मध्ये तब्बल ५० दिवस मनपाची सर्व बँक खाते सील केली होती. डीआरटीच्या डिक्री नोटिशीला स्थगिती मिळावी, म्हणून मनपाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर मुंबई उच्च न्यायालयाने दरमहा तीन कोटींचा हप्ता हुडकोला अदा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनपा दरमहा तीन कोटीचा हप्ता अदा करीत आहे. या डिक्री नोटिशीला स्थगिती घेण्यासाठी मनपा प्रशासनाने डीआरएटीमध्ये अपिल केले. मात्र, ते फेटाळण्यात आले. हुडको कर्जाची एकरकमी परतफेड करण्याच्या निर्णयासाठी अनेक संयुक्त बैठकादेखील झाल्या. मात्र, डीआरटीने दिलेल्या डीक्री नोटीसनुसार ३४१ कोटी रुपयांच्या डिक्रीवर ९ टक्के व्याजाप्रमाणे ३९१ कोटी ४ लाखाची रक्कम भरावी, या भूमिकेवर हुडको ठाम असल्याने तिढा कायम आहे.

ऐन पावसाळ्यात हुडकोने महापालिकेची बँक खाती गोठविल्यामुळे प्रशासनाची आर्थिक कोंडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महापालिकेला दैनंदिन कामांसह आपत्कालीन उपाययोजना करणेदेखील अवघड होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून डीआरटीमधील मुंबई येथील विधितज्ज्ञांशी रात्री उशिरापर्यंत या विषयावर फोनवरून चर्चा सुरू होती.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

मनपा प्रशासनाला बुधवारी (दि. २६) सायंकाळी डीआरटीचे पत्र मिळाले आहे. याबाबत आयुक्तांना विचारले असता, आपण त्याचा अभ्यास करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, महापालिकेचे उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी डीआरटीने महापालिकेचे बँक खाते सील केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत शहराचे आमदार सुरेश भोळे यांनीदेखील माहिती घेतली असून, मुंबईत ते या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -