Home शहरे पुणे गर्भवतींनी लस घ्यावी का?; जाणून घ्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर

गर्भवतींनी लस घ्यावी का?; जाणून घ्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर

0
गर्भवतींनी लस घ्यावी का?; जाणून घ्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर

म. टा. प्रतिनिधी, पुणेः गर्भवतींना कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सिन लस देण्याबाबतचे क्लिनिकल ट्रायल अद्याप देशात करण्यात आले नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कागदोपत्री निष्कर्ष हातात नसल्याने गर्भवतींना सध्या तरी लसीकरण करण्यात येऊ नये, अशा सूचना केंद्र सरकारने जारी केल्या आहेत. राष्ट्रीय स्त्री रोग संघटनेने (फॉग्सी) गर्भवतींना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लसीकरण गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.

केंद्र सरकारने १८ ते ४४; तसेच ४५ वयापुढील सर्वांना लसीकरणाचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र, गर्भवतींना लसीकरण करण्याची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे गर्भवतींनी लसीकरण करावे, की करू नये, याबाबत स्त्री रोग तज्ज्ञांसह गर्भवतींमध्ये संभ्रम आहे. त्या संदर्भात ‘मटा’ने स्त्री रोगतज्ज्ञांशी संवाद साधला असता लसीकरणाबाबतची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

‘भारतात दिल्या जाणाऱ्या ‘कोव्हिशील्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही लशींचा गर्भवतींना देण्याबाबतची ‘क्लिनिकल ट्रायल’ झाली नाही. त्यामुळे गर्भवतींच्या लसीकरणाने नेमका काय फायदा किंवा तोटा होतो; तसेच काही विपरित परिणाम दिसून येतात का, हे अद्याप तपासण्यात आले नाही. त्यामुळे गर्भवतींना सध्या लसीकरण करण्यात येऊ नये, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

मात्र, स्त्री रोगतज्ज्ञांच्या राष्ट्रीय संघटनेने देशातील गर्भवतींना लसीकरण करणे गरजेचे आहे अशी शिफारस केली आहे. ‘लसीकरणामुळे गर्भवतींमध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार होईल. त्यांच्यासह बाळाचे संरक्षण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यासाठी त्यांनाही लसीकरण करणे गरजेचे आहे,’ अशी माहिती स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. वैजयंती पटवर्धन यांनी दिली.

रक्ताच्या गुठळीचा गर्भवतींना धोका?

– सध्याच्या परिस्थितीत लसीकरण केल्यास गर्भवती महिलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार होऊ शकते. मात्र, काही प्रमाणात रक्ताची गुठळी होण्याचा आहे.

– गर्भवतींना लस दिल्यास त्याचा आई आणि बाळावर नेमका काय परिणाम होईल, याबाबत सध्या विचार सुरू आहे. लसीकरणामुळे गर्भवतीची प्रसूति मुदतपूर्व होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

– ‘दुसऱ्या लाटेत विदारक स्थिती समोर आल्याने गर्भवतींना लस देणे गरजेचे आहे,’ असे स्त्री रोगतज्ज्ञ सांगतात.

– अमेरिकेतील ‘एमआरएनए’ या कंपनीची लशीची क्लिनिकल ट्रायल झाली असून, त्यात गर्भवतींना लस दिल्यास रोगप्रतिकारशक्ती अधिक तयार होत असल्याचे निष्कर्ष हाती आले आहेत, असे स्त्री रोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींच्या उत्पादन प्रक्रियेत; तसेच लशीतील घटकांमध्ये फरक आहे. लशीमुळे होणाऱ्या फायद्यांच्या प्रमाणात बदल आहे. क्लिनिकल ट्रायल झाल्याने या दोन्ही लशींमुळे किती आणि कोणत्या प्रकारे धोका आहे, हे सांगता येते. देशात गर्भवतींना दिलेल्या लशीचा कोणताही पुरावा किंवा अभ्यास झाला नाही.

– डॉ. वैजयंती पटवर्धन,

स्त्री रोगतज्ज्ञ

गर्भवतींमध्ये करोनाचा संसर्ग झाला, तर तो धोकादायक आहे. गर्भपात होण्याची शक्यता असते किंवा प्रसूतिवेळी संसर्ग झाल्यास आणखी गुंतागुंत होऊन जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुंतागुंत टाळण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. दोन्ही डोसचे लसीकरण झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी महिलांनी गर्भधारणेचे नियोजन करावे.

– डॉ. सुनीता तांदूळवाडकर,

अध्यक्ष, पुणे स्त्री रोगतज्ज्ञ संघटना

Source link