Home शहरे पुणे लसीकरणासाठी प्राधान्यक्रम निश्चित; पालिकेकडे ३० हजार लस उपलब्ध

लसीकरणासाठी प्राधान्यक्रम निश्चित; पालिकेकडे ३० हजार लस उपलब्ध

0
लसीकरणासाठी प्राधान्यक्रम निश्चित; पालिकेकडे ३० हजार लस उपलब्ध

म. टा. प्रतिनिधी, पुणेः महापालिकेला ३० हजार लशी उपलब्ध झाल्या असून, त्यांचे वाटप शहरातील ११५ लसीकरण केंद्रांवर करण्यात येणार आहे. त्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मुख्यत्वे ‘कोव्हॅक्सिन’ देण्यात येणार आहे, तर दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या साडेसहा लाख नागरिकांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

ज्यांनी पाच एप्रिलपूर्वी ‘कोव्हॅक्सिन’, तर २० मार्चपूर्वी ‘कोव्हिशील्ड’ लस घेतली आहे, त्यांनाच दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्याच वेळी ४५पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना मात्र तूर्त तरी पहिला डोस मिळणार नसल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेला ‘कोव्हिशील्ड’च्या २० हजार, तर ‘कोव्हॅक्सिन’च्या १० हजार लस राज्य सरकारकडून उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शहरातील आतापर्यंत सुमारे आठ लाख नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्यापैकी साडेसहा लाख नागरिकांना दुसरा डोस देणे बाकी आहे. या साडेसहा लाख नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी कोव्हिशील्ड लशीसाठी ४५ दिवस, तर ‘कोव्हॅक्सिन’साठी ३० दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’ लस देण्यात येणार आहे. महापालिकेच्या दोन केंद्रांवर यापूर्वी उपलब्ध असलेली ‘कोव्हिशील्ड’ देण्यात येणार आहे.

पहिल्या डोससाठी ‘अपॉइंटमेंट’च

‘कोविन-अॅप’वर नोंदणी केलेल्या आणि या पाच केंद्रांवरील लसीकरणाची ‘अपॉइंटमेट’ मिळालेल्या नागरिकांनाच पहिला डोस देण्यात येणार आहे. लसीकरण केंद्रांवर येऊन अपॉइंटमेंट घेणाऱ्या (वॉक इन) नागरिकांना लस देण्यात येणार नाही. गेल्या काही दिवसांत केवळ दोनच रुग्णालयांत पहिला डोस देण्यात येत असल्याने अवघ्या एका मिनिटात येथील अपॉइंटमेट ‘बुक’ होत होत्या. आता त्यात वाढ करण्यात आली असून, पाच रुग्णालये मिळून २,२०० डोस प्रतिदिनी देण्यात येणार आहेत. यात यापूर्वीच्या दोन रुग्णालयांत ‘कोव्हिशील्ड’, तर उर्वरित तीन रुग्णालयांत ‘कोव्हॅक्सिन’ लस मिळणार आहे.

येथे मिळणार दुसरा डोस

राजीव गांधी रुग्णालय (येरवडा), नायडू रुग्णालय (ताडीवाला रस्ता), कमला नेहरू रुग्णालय (मंगळवार पेठ), जयाबाई सुतार दवाखाना (कोथरूड), भानगिरे दवाखाना (महमंदवाडी), शिवशंकर पोटे दवाखाना (पद्मावती), बारटक्के दवाखाना (वारजे), थोरवे रुग्णालय (जांभूळवाडी), अण्णासाहेब मगर रुग्णालय (हडपसर), सावित्रीबाई फुले रुग्णालय (कोंढवा), धनकवडे प्रसूतिगृह (बालाजीनगर), मुरलीधर लायगुडे रुग्णालय (धायरी), दळवी रुग्णालय (शिवाजीनगर), नामदेवराव शिवरकर दवाखाना (महर्षिनगर), रेल्वे रुग्णालय (पुणे स्टेशन), गलांडे पाटील दवाखाना (नगर रस्ता) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर दवाखाना (डायस प्लॉट) या ठिकाणी नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस मिळणार आहे.

त्यांना पहिला डोस नाही

अठरा ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी हालचाली सुरू केल्या असल्या, तरी लशींची संख्या अत्यंत मर्यादित आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने त्यांनाही प्राधान्य देण्यात येत आहे. यामुळे ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना पहिला डोस मिळण्यात अडचणी येत आहेत. महापालिकेने सध्या केलेल्या नियोजनात या नागरिकांना सध्या तरी पहिला डोस मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण

हॉस्पिटलचे नाव लसीचा प्रकार एकूण डोस

कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ कोव्हिशील्ड ३५०

राजीव गांधी रुग्णालय, येरवडा कोव्हिशील्ड ३५०

अण्णासाहेब मगर रुग्णालय, हडपसर कोव्हॅक्सिन ५००

जयाबाई सुतार दवाखाना, कोथरूड कोव्हॅक्सिन ५००

मुरलीधर लायगुडे रुग्णालय, धायरी कोव्हॅक्सिन ५००

Source link