वसईच्या पाचूबंदर येथे राहणाऱ्या विल्सन यांनी आपली बोट पाचूबंदर किनाऱ्यावर नांगरून ठेवली होती. ही मासेमारी बोट अचानक सुटली आणि तरंगत पाचूबंदरजवळील बेणापट्टी येथील किनाऱ्यावर जाऊन अडकली. सोमवारी दुपारी अडकलेली बोट काढण्यासाठी तत्काळ गोखिवरे यथे राहणाऱ्या इरफान खान नावाच्या व्यक्तीचा जेसीबी मागविण्यात आला होता. मात्र बोट बाहेर काढत असताना अचानक समुद्राला भरती आली आणि काही समजण्याआधीच जेसीबीला पाण्याने वेढा घेतला. जेसीबी पूर्ण समुद्राच्या पाण्यात अडकला होता. जेसीबी चालकाने तो काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र सायंकाळ झाली होती आणि समुद्राला मोठी भरती येत असल्याने ते काढणे जिकिरीचे झाले होते. त्यामुळे जेसीबी बाहेर काढण्याचे प्रयत्न थांबविले आणि जेसीबीचालक सुखरूप बाहेर आला.
सोमवारी पूर्ण रात्र हा जेसीबी समुद्रात होता. मंगळवारी सकाळी पुन्हा त्याला काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अखेर वसई पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. येथील स्थानिक नागरिक तसेच वसई पोलिसांच्या मदतीने हा जेसीबी क्रेनच्या सहाय्याने मंगळवारी दुपारी बाहेर काढण्यात यश आले आहे. हा अडकलेला जेसीबी आणि बोट दोन्ही सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे वसईचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याण करपे यांनी सांगितले.