हायलाइट्स:
- पुन्हा एकदा सोनी टिव्हीवरून प्रसारित होणार केबीसी
- केबीसीच्या १३ व्या सिझनसाठी या तारखेपासून होणार नोंदणी
- करोना काळातही या कार्यक्रमात सहभागासाठी उत्सुकता कायम
सोनी टीव्हीच्या इन्स्टाग्राम चॅनेलवर केबीसीच्या १३ व्या सिझनची माहिती देणारी पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात नमूद केले आहे की, ‘पुन्हा एकदा अमिताभ बच्चन घेऊन येत आहेत केबीसीसाठी लाखमोलाचे प्रश्न. तर फोन उचला आणि तयारीत राहा कारण नोंदणीला १० मे पासून सुरुवात होणार आहे. #KBC१३ ची नोंदणी.’ करोनाच्या या संकटकाळामध्ये प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी केबीसी पुन्हा सुरू होत आहे.
गेल्यावर्षी केबीसीमध्ये झाले होते बदल
गेल्यावर्षी केबीसी १२ हा कार्यक्रम २८ सप्टेंबर या दिवशी प्रसारित झाला होता. त्याची टॅगलाईन होती, ‘जो भी हो, हर सेटबॅक का जवाब कमबॅक से दो.’ केबीसीच्या १२ व्या सिझनमध्ये भोपाळ येथील आरती जगताप या कार्यक्रमाच्या पहिल्या स्पर्धक होत्या. या कार्यक्रमामध्ये करोनामुळे काही बदल करण्यात आले होते. त्यामध्ये ऑडियन्स पोल ही लाइफ लाइन व्हिडिओ- ए-फ्रेंडमध्ये बदलण्यात आली होती. नाजिया नजीम या स्पर्धक १ कोटी रुपये जिंकणारी पहिली स्पर्धक ठरली होती. या सिझनचा शेवटचा भाग २२ जानेवारी रोजी प्रसारित झाला होता.
लोकांचा उत्साह आजही कायम
कौन बनेगा करोडपती हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. दरवर्षी या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने प्रतिक्षा करत असतात. कारण या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना स्वप्नपूर्ती करता येते त्याचप्रमाणे महानायक अमिताभ बच्चन यांना भेटण्याची सुवर्णसंधी मिळते. गेल्यावर्षीही करोनाच्या काळामध्ये केबीसीचे संपूर्ण काळजी घेऊन हे चित्रिकरण करण्यात आले होते. या कार्यक्रमात करोना प्रतिबंधक नियमांचे अत्यंत काटेकोर पालन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्पर्धक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. त्यांचा हा उत्साह खरोखरच कौतुकास्पद असा असतो.