Home शहरे पुणे रक्तदानाची ‘ही’ अट शिथिल

रक्तदानाची ‘ही’ अट शिथिल

0
रक्तदानाची ‘ही’ अट शिथिल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लसीकरण केलेल्या लाभार्थ्यांनी ५६ दिवसांनी रक्तदान करावे, ही पूर्वी असणारी अट आता शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आता लसीकरणाचा प्रत्येक डोस घेतल्यावर १४ दिवसांनी रक्तदान करणे शक्य होणार आहे. त्यामुळे वय १८ ते वय ४४ या वयोगटातील व्यक्तींना रक्तदान करण्यासाठी जास्त दिवस वाट पाहण्याची गरज राहणार नाही.

केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून देशात लसीकरण सुरू केले आहे. त्या लसीकरणानंतर रक्तदान करणे अनेकांना अशक्य झाले आहे. परिणामी, पुण्यासह महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. काही आठवड्यांपूर्वी पुण्यात अवघ्या तीन ते चार दिवस पुरेल एवढाच साठा होता. त्या वेळी शहरातील रक्तपेढ्यांसह शिबिर संयोजकांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. रक्ताचा तुटवडा असल्याने प्लाझ्मासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत होते.

यापूर्वी लशीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर प्रत्येकी २८ दिवसांनी रक्तदान करण्याची मुभा होती; म्हणजेच लसीकरणानंतर ५६ दिवसांनी रक्तदान करणे शक्य होत होते. हा कालावधी मोठा असल्याने रक्तदाते रक्तदानापासून वंचित राहत होते. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होत होता. या अटींमुळे अडचणी निर्माण होत होत्या. दरम्यान, यापूर्वी ४५ वर्षांपुढील वयोगटातील व्यक्तींना लस दिली जात होती. आता राज्यात वय १८ ते वय ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. या वयातील व्यक्तींनी एकदा लसीकरण केल्यास रक्तदान करण्यासाठी पुन्हा ५६ दिवस वाट पाहावी लागेल. त्यामुळे रक्तदानाचा आणखी मोठ्या प्रमाणात तुटवडा होण्याची भीती शहरातील रक्तपेढ्यांनी व्यक्त केली होती. ही शक्यता लक्षात घेऊन याबाबत लक्ष घालण्याची विनंती राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेला करण्यात आली होती. त्यानंतर परिषदेने या परिस्थितीबाबत गांभीर्याने विचार करून नियमांमध्ये बदल केला आहे. आता ५६ दिवसांऐवजी प्रत्येक डोसनंतर १४ दिवसांनी रक्तदान करण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती रक्तपेढ्यांच्या संचालकांनी दिली. त्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त महासंचालक डॉ. सुनील गुप्ता यांनी आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे रक्तदानाला चालना मिळणे शक्य आहे. ‘लसीकरणापूर्वी १८ ते ४४ वयातील व्यक्तींनी रक्तदान करावे,’ असे आवाहन करण्यात आले.

.

पूर्वी लसीकरण केल्यानंतर ५६ दिवसांनी रक्तदान करावे लागत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा होत होता. आता ही अट शिथिल करण्यात आली असून, लशीच्या प्रत्येक डोसनंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येणार आहे.

– दिनेश खिवंसरा, सहायक आयुक्त, एफडीए

Source link