हायलाइट्स:
- सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या सेटवर आमदाराचा गोंधळ
- गोव्यातील मडगाव येथे सुरू आहे कार्यक्रमाचे चित्रीकरण
- करोना रुग्ण वाढत असल्याने चित्रीकरण बंद करण्याची मागणी
गोव्यामध्येही दिवसागणिक करोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे गोव्यात सुरू असलेल्या मालिकांच्या चित्रीकरणाला स्थानिक आणि राजकीय पक्ष विरोध करत आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या सेटवर जाऊन गोंधळ घालत चित्रीकरण थांबवण्याची मागणी केली आहे.
या कार्यक्रमाचे चित्रीकरण मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून मडगांव आणि परिसरातील करोना रुग्णांची संख्या खूपच वाढत चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये येथे चित्रीकरण करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टनसिंगचे पालन केले जात नसल्याचा आरोपही आमदार देसाई यांनी केला आहे. तसेच कार्यक्रमाशी संबंधितांशी त्यांनी चांगलीच झाडाझडती घेतली आहे.
या घटनेचा व्हिडीओ आमदार सरदेसाई यांनी ट्विटवर शेअर करत त्यांची भूमिका मांडली आहे. आता या घटनेनंतर पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.