Home शहरे पुणे पुण्याबाहेरील रुग्णसंख्येत वाढ

पुण्याबाहेरील रुग्णसंख्येत वाढ

0
पुण्याबाहेरील रुग्णसंख्येत वाढ

म. टा. प्रतिनिधी,
पुणे शहरातील करोनाचा विळखा सैल होत असतानाही शहरातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होण्याची चिन्हे नाहीत. पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा; तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील ३५ ते ४० टक्के रुग्ण सध्या पुणे शहरात उपचार घेत आहेत. महापालिकेच्या शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयात गेल्या महिनाभरात पुणे शहराबाहेरील ३० टक्के रुग्णांनी उपचार घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

महापालिकेने करोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या वाढल्यानंतर बाणेर येथील डेडिकेटेड कोव्हिड केअर सेंटर, शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयासह आठ रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध केली. खासगी रुग्णालयांमधील १०० खाटा आरक्षित करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे १० हजार खाटांपर्यंत ही संख्या वाढवण्यात आली. त्यानंतरही रुग्णांना उपचारांसाठी खाटा मिळत नसल्याचे चित्र दिसत होते. गेल्या १० दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर खाटा मिळण्याचे प्रमाण वाढले आहे.

पुणे शहरात १७-१८ एप्रिलदरम्यान करोनाचा सर्वोच्च बिंदू आल्याचे चित्र दिसत आहे. संपूर्ण देशाचा आणि ग्रामीण भागाचा विचार करता हा सर्वोच्च बिंदू ११ ते १५ मेच्या दरम्यान येईल, असे निरीक्षण ‘सीपीसी अॅनालिटिक्स’चे साहिल देव यांनी नोंदवले आहे. सध्या ग्रामीण भागात वेगाने संसर्ग सुरू असून, ही परिस्थिती पुढील १० दिवस राहील असा अंदाज आहे. जम्बो रुग्णालयाचा विचार केला, तर पुणे जिल्ह्यातील (ग्रामीण भागातील) आणि जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या ५५० आहे. यातील गंभीर रुग्ण पुणे शहरात उपचारांसाठी येत आहेत.

गेल्या महिनाभरात

‘जम्बो’त दाखल रुग्ण

पुणे शहर – १६००

पिंपरी-चिंचवड-१००

पुणे ग्रामीण- २००

पुणे जिल्ह्याबाहेरील- ३५०

एकूण – २,२५०

Source link