Home शहरे नाशिक पिसाळलेल्या श्वानाचा पाच मुलांना चावा

पिसाळलेल्या श्वानाचा पाच मुलांना चावा

नाशिक : जुने नाशिक परिसरातील सुमारे पाच मुलांसह महिला, पुरुषांना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्याची घटना शुक्रवारी (दि.२८) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेतील जखमी मुलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. जुन्या नाशकात काही दिवसांपासून मोकाट श्वानांचा उपद्रव वाढल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मनपा प्रशासनाने मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
जुने नाशिक परिसर गावठाण म्हणून ओळखला जातो. या भागात अरुंद गल्लीबोळ व दाट लोकवस्ती आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात मोकाट श्वानांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी एका पिसाळलेल्या मोकाट श्वानाने एक दोन नव्हे तर तब्बल आठ ते दहा जणांवर हल्ला चढवून चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे जुन्या नाशकात श्वानांची दहशत पसरली असून, नागरिक भयभीत झाले आहेत. श्वान लहान मुलांच्या अंगावर चवताळून जात आहे. चौकमंडई, बागवानपुरा, कथडा, बडी दर्गा, पिंजारघाट, गंजमाळ या भागातील पाच मुलांसह एकूण नऊ व्यक्तींना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्याची घटना घडली आहे.
जखमींमध्ये वसीम सत्तार (३०), अशरफ खान (५४), फैयाज खान (४४), हमीद अन्सारी, अलाउद्दीन सय्यद, जोया कोकणी, सोहम शिवाळे, आयशा सय्यद, रमेश पाटोळे यांचा समावेश आहे. पिसाळलेल्या श्वानाने जुने नाशिक परिसरात नऊ जणांना चावा घेतल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
घटना गंभीर; सुदैवाने अनर्थ टळला
जुने नाशिक परिसरातील महिला, पुरुषांसह लहान मुलांना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेण्याची घटना गंभीर स्वरूपाची असून सुदैवाने अनर्थ टळला, अन्यथा गंभीर जखमी होऊन जीवितहानीचाही धोका ओढावला असता. श्वानाने किरकोळ स्वरूपात जखमी केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. महापालिका प्रशासनाने या भागात सातत्याने मोकाट श्वानांच्या बंदोबस्ताची मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.