Home अश्रेणीबद्ध कोंढवा दुर्घटनेला बिल्डरचा हलगर्जीपणा जबाबदार, चौकशी वेळी धक्कादायक माहिती उघडकीस

कोंढवा दुर्घटनेला बिल्डरचा हलगर्जीपणा जबाबदार, चौकशी वेळी धक्कादायक माहिती उघडकीस

पुण्यातील कोंढवा भागात शनिवारी अल्कॉन सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना पहाटे २ वाजताच्या सुमारास कोंढव्यातील तालाब कंपनी समोर घडली. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

या चौकशीवेळी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्कॉन सोसायटीतील रहिवाश्यांनी फेब्रुवारी महिन्यातच या संरक्षक भिंतीबाबत बिल्डरला माहिती दिली होती. संरक्षक भिंतीलगत बांधकामासाठी खोदकाम सुरु असल्याने भिंतीला धोका निर्माण झाल्याचे रहिवाशांनी बिल्डरबरोबरील बैठकीत सांगितले होते. मात्र बिल्डरने रहिवाश्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. तसेच याबाबतचा ई-मेल पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनाही केला होता. त्यामुळे या हलगर्जीपणाचा फटका गोर गरिब मजुरांना बसला.

दरम्यान सुमारे १५ फूट उंचीची ही भिंत कामगारांच्या घरावर पडली होती. काही महिन्यांपूर्वी याठिकाणी बांधकाम सुरु झाले होते. संबंधित बिल्डरने अल्कॉन सोसायटीच्या संरक्षक भिंतीलगत कामगारांना राहण्यासाठी पत्र्याचे शेड उभा केले होते. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे आणि बाजूला सुरु असलेल्या खोदकामामुळे अल्कॉन सोसायटीची संरक्षक भिंत मजूर राहत असलेल्या घरावर कोसळली आणि झोपेत असलेले मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर काळाने घाला घातला.