Home गुन्हा कामगार वसाहतींची तपासणी सुरू

कामगार वसाहतींची तपासणी सुरू

कोंढवा दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पालिकेकडून दक्षता

पुणे : कोंढवा दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिकेकडून शहरातील बांधकामांच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या लेबर कॅम्पची तपासणी सुरू करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी जाऊन ही तपासणी केली जात असून त्याचा अहवाल मंगळवारी तयार केला जाणार आहे. या तपासणी अहवालात, धोकादायक असलेल्या वसाहती तातडीने हलविण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी बांधकाम व्यावसायिकांच्या अग्रणी असलेल्या क्रेडाई आणि मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनांना नाले, सिमाभिंत तसेच झाडाच्या खाली असलेले धोकादायक लेबर कॅम्प तातडीने हटविण्याची विनंती केली होती. त्यानंतरही हा अपघात घडला आहे. ही बाब लक्षात घेऊन या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून तातडीने सर्व कामगार वसाहतींचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. त्यात प्रमुख्याने वसाहती धोकादायक ठिकाणी आहेत.

झाड, नाल्याचा पूर तसेच सिमाभिंत अथवा धोकादायक ठिकाणाच्या पायथ्याला अशा वसाहती आहेत का, त्या ठिकाणी किती लोक राहतात, बांधकाम व्यावसायिक कोण आहे, बांधकामाला महापालिकेने परवानगी दिलेली आहे का, कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यात आली आहे का याचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

धोकादायक वसाहती हलविणार 
सर्वेक्षणाची माहिती एकत्र संकलीत करून धोकादायक वसाहतींची यादी महापालिकेकडून निश्‍चित करून तातडीने या वसाहती सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच याबाबत संबंधित बांधकाम व्यावसायिकास नोटीस बजाविण्यात येणार असून याबाबत त्यांचा खुलासा मागविण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांनी स्पष्ट केले.