Home बातम्या आंतरराष्ट्रीय युरोपात प्रवेश करू पाहाणारे 40 स्थलांतरित लिबियात ठार

युरोपात प्रवेश करू पाहाणारे 40 स्थलांतरित लिबियात ठार

लिबियाची राजधानी त्रिपोलीच्या बाहेर असणाऱ्या डिटेन्शन सेंटरवर झालेल्या हल्यामध्ये 40 स्थलांतरितांचा मृत्यू झाल्याचं सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

या हल्ल्यामध्ये ठार झालेले बहुतके जण हे लिबियामधून गुप्तपणे समुद्र ओलांडून युरोपात जाण्याचा प्रयत्न करणारे आफ्रिकन असल्याचं समजतंय.

हवाई हल्ल्यामध्ये या केंद्रातले जवळपास 80 जण जखमी झाल्याचं लिबिया सरकारने म्हटलंय. लिबिया सरकारला संयुक्त महासंघाने (युनायटेड नेशन्स) पाठिंबा दिला आहे.

हा बॉम्ब हल्ला सरकारी सेनांनीच केल्याचा आरोप सरकारविरुद्ध लढणाऱ्या जनरल खलिफा हफ्तार यांच्या गटाने केला आहे.

अशा हजारो स्थलांतरितांना अडवून सरकारी डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवलं जातं.

सीरियावर दीर्घ काळ राज्य करणाऱ्या मुअम्मार गद्दाफी यांनी निलंबित करत 2011मध्ये त्यांची हत्या करण्यात आली. तेव्हापासून देशात हिंसा आणि अराजक आहे.

हल्ल्याबद्दलची माहिती

ताजौरा डिटेन्शन सेंटरमधल्या हँगरमध्ये जवळपास 120 स्थलांतरित होते. मंगळवारी संध्याकाळी याच सेंटरवर हल्ला झाल्याचं आपत्कालिन सेवांसाठीचे प्रवक्ते ओस्मान अली यांनी एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

ताजौरामध्ये सध्या सुमारे 600 स्थलांतरित राहत आहेत.

हल्ल्यामध्ये ठार झालेल्यांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश असल्याचं गुमा एल-गमाटी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. संयुक्त राष्ट्रसंघांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या राजकीय संवाद गटाचे ते सदस्य आहेत.

लिबियन आरोग्य मंत्रालयातले अधिकारी डॉक्टर खालिद बिन अतिया यांनी घटनास्थळाला भेट दिली. बीबीसीला त्यांनी सांगितलं, “लोक सैरभैर झाली होती, कॅम्प उद्ध्वस्त झाला होता, लोक रडत होती. त्यांना मानसिक धक्का बसलेला होता. या भागातली वीजही बंद करण्यात आली होती.”

“आम्ही अंधारात तो भाग अगदी स्पष्टपणे पाहू शकलो नाही पण अॅम्ब्युलन्स आली तेव्हा जे दिसलं ते भयंकर होतं. सगळीकडे रक्त पसरलं होतं आणि मानवी शरीराचे अवशेष होते.”

दोष कुणाचा?

संयुक्त राष्ट्रसंघाचा पाठिंबा असणाऱ्या पंतप्रधान फाएज अल्-सराज यांच्या गव्हर्मेंट ऑफ नॅशनल अकॉर्ड (जीएनए)ने लिबियन नॅशनल आर्मी (एलएनए)ने हा हवाई हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

हा घृणास्पद हल्ला पूर्वनियोजित होता आणि विशिष्ट उद्देशाने करण्यात आल्याचं सरकारने म्हटलंय.

ज्या भागामध्ये हा हल्ला झाला त्या भागात जनरल हफ्तार यांची लिबियन नॅशनल आर्मी – एलएनए आणि सरकारी फौजांमध्ये युद्ध सुरू आहे.

युद्धासाठीचे ‘पारंपरिक मार्ग’ संपले असून आता आपण त्रिपोलीमधल्या विविध टार्गेट्सवर मोठे हवाई हल्ले सुरू करणार असल्याचं एलएनएने सोमवारी जाहीर केलं होतं.

तर आपल्या विमानांनी या सेंटरजवळच्या सरकार धार्जिण्या कॅम्पवर हल्ला केला होता आणि त्याला सरकारी फौजांनी प्रत्त्युत्तर दिलं आणि यामध्ये चुकून स्थलांतरितांच्या सेंटरवर हल्ला झाल्याचं एलएनएने म्हटलंय.

या हल्ल्यांमागे कोणाचा हात होता हे नेमकं सांगता येणार नसल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासित एजन्सीच्या प्रवक्ते चार्ली यॅक्सले यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

लिबियामध्ये युद्ध का सुरू आहे?

लिबियामध्ये सध्या पूर्णपणे कोणाचंही नियंत्रण नाही. देश अतिशय अस्थिर असून विविध राजकीय आणि लष्करी गटांमध्ये देशाचं विभाजन झालेलं आहे. यातल्या एका गटाचं प्रतिनिधित्व पंतप्रधान सर्राज करत आहेत तर जनरल हफ्तार दुसऱ्या गटाचे प्रमुख आहेत.

जनरल हफ्तार यांच्या सेनेने एप्रिल महिन्यात सरकार विरुद्ध बंड पुकारलं होतं.

हफ्तार हे लिबियाच्या राजकारणामध्ये गेल्या चार दशकांपेक्षा जास्त काळ कार्यरत असून ते गद्दाफींच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक होते. 1980च्या दशकामध्ये झालेल्या वादानंतर त्यांनी लिबियातून पळ काढत अमेरिकेत आश्रय घेतला होता.

2011मध्ये उठावाला सुरुवात झाल्यानंतर ते लिबियामध्ये परतले. त्यांनी देशाच्या पूर्वेकडे आपला तळ बनवला असून आणि त्यांना फ्रान्स, इजिप्त आणि अरब अमिरातीकडून थोडा पाठिंबा मिळालेला आहे.

पण लिबियन नागरिकांच्या मात्र त्यांच्याबद्दल संमिश्र भावना आहेत कारण ते आधी गद्दाफींच्या सोबत होते आणि त्यांचे अमेरिकेशीही संबंध होते. पण बेंगाझी शहर आणि जवळपासच्या परिसरातून इस्लामी अतिरेक्यांना बाहेर पळवण्याचं श्रेय काहीजण त्यांना देतात.

लिबियातल्या स्थलांतरितांची सध्याची परिस्थिती कशी आहे?

लिबियामध्ये सुरू असलेल्या राजकीय गदारोळामध्ये मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या वाढलेल्या आहेत. आफ्रिकेच्या सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील देशातून येणाऱ्या स्थलांतरितांकडून माणशी हजारो डॉलर्स उकळले जात आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघ लिबियाच्या तटरक्षक दलासोबत काम करतं आणि स्थलांतरितांच्या बोटी अडवतं. पण जिथे अनेक स्थलांतरितांना ठेवलं जातं डिटेन्शन सेंटरमधली व्यवस्था वाईट असल्याचं मानवी हक्क कार्यकर्त्यांनी वेळोवेळी निदर्शनास आणून दिलं आहे.

जिनिव्हामधील इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनचे प्रवक्ते लिओनार्ड डॉयल यांनी सांगितलं की स्थलांतरितांना योग्य रितीने वागवलं जात नसून त्यांची राहण्याची नीट व्यवस्था केली जात नाही.

“हे डिटेन्शन सेंटर लष्करी कार्यशाळेच्या अगदी बाजूलाच आहे. यापूर्वीही तिथे हल्ला झाला होता,” ते म्हणाले.

“युरोपमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थलांतरितांना लिबियन तटरक्षकदल पकडतं. त्यांना किनाऱ्यावर परत आणलं जातं आणि शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या 60पैकी एका छावणीमध्ये त्यांना बसने आणण्यात येतं. पण तिथली स्थिती चांगली नसते.”