Home ताज्या बातम्या धोतराच्या पायघड्या अन् मेढ्यांचे रिंगणाने तुकोबांच्या पालखीचे स्वागत

धोतराच्या पायघड्या अन् मेढ्यांचे रिंगणाने तुकोबांच्या पालखीचे स्वागत

काटेवाडी : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सकाळी बारामती येथून मार्गस्थ झाला. वाटचालीत मोती, आर्या बाग, बांडलवाडी पिपळी, लिमटेक येथे ग्रामस्थानी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले.
गावात ठिकठिकाणी कमानी उभारल्या होत्या. पताका, रांगोळ्यामुळे अधिकच भक्तिमय वातावरण झाले होते. त्यानंतर पालखी काटेवाडीच्या दिशेने निघाली. काटेवाडी परिसरातील भाविकांनी काटेवाडी फाट्यावर पालखीच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी केली होती. शालेय विद्यार्थिनींनी पालखीचे लेझीम, बँड वाजून पालखीचे स्वागत केले.यावेळी पार्थ पवार, जयश्री पवार उपस्थित होते. पालखी सोहळा काटेवाडी गावात जाताना परीट समाजाकडून धोतराच्या पायघड्या घालून स्वागत करण्याची परंपरा आहे. अनेक वर्षांपासूनची परंपरा सुरू आहे. संत गाडगे महाराजांच्या शिकवणुकीतून परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. काटेवाडीच्या वेशीजवळ आल्यानंतर पालखी काटेवाडीच्या ग्रामस्थांनी खांद्यावर घेतली. त्या वेळी पायघड्या घालून पालखीचे स्वागत करतात. या वेळी घरांबाहेर रांगोळ्यांच्या पायघड्याही घालण्यात आल्या होत्या. पार्थ पवार यांनी पालखी खांद्यावर घेतली. पालखी दर्शनासाठी परिसरातील भावीक आले होते. त्यानंतर विसावा झाला व गाव जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. जेवण झाल्यानंतर वारकऱ्यानी शेतविहारात आराम केला.भवानीनगर येथे पालखी सोहळ्याचा इंदापूर तालुक्यात प्रवेश झाला. आज पालखी सणसर येथे मुक्कामी असणार आहे. गुरुवारी सकाळी निमगावकेतली ला मार्गस्थ होणार आहे.
…………..
काटेवाडीच्या अंगणी मेंढ्या धावल्या रिंगणी
पायघड्या धोतराच्या झाला गजर हरी नामाचा…विसाव्यानंतर ‘ज्ञानदेव माउली तुकाराम’चा जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर अशा वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मेंढ्यांचे पहिले गोल रिंगण काटेवाडीत पार पडले. रिगणं पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
रिंगणात पाचशे मेंढ्या
या रिंगणाच्यावेळी मध्यभागी पालखी ठेवण्यात येते पाचशे मेंढ्या पालखीभवती सोडतात त्या पालखीस पूर्ण पालखीस प्रदक्षिणा घालतात यावेळी वारकऱ्यांमधून तुकाराम महाराज की जय, जय हरी चा गजर मोठमोठ्याने होत होता. वारकरी फुगड्या खेळत होते अभंग म्हणत होते. गात नाचत होते. पूर्ण परिसर हा तुकाराम महाराजाच्या नामाने नाहून निघाला. त्यानंतर सोहळ्याची पुन्हा वाटचाल सुरू झाली.