Home क्रीडा शाकिब अल हसनने रचला इतिहास, असा पराक्रम करणारा पहिलाच क्रिकेटपटू

शाकिब अल हसनने रचला इतिहास, असा पराक्रम करणारा पहिलाच क्रिकेटपटू

बर्मिंगहॅम: मंगळवारी(2 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध बांगलादेश संघात 40 वा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 28 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने उपांत्य फेरीतील स्थानही पक्के केले आहे. मात्र बांगलादेशचे या स्पर्धतील आव्हान संपले आहे.

असे असले तरी बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसनने विश्वचषकात इतिहास रचला आहे. त्याने या सामन्यात गोलंदाजी करताना भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतची विकेट घेतली. तसेच फलंदाजी करताना त्याने बांगलादेशकडून या सामन्यात सर्वाधिक 74 चेंडूत 66 धावा केल्या.

याबरोबरच त्याच्या या विश्वचषकात आत्तापर्यंत 7 सामन्यात खेळताना 542 धावा झाल्या आहेत. तसेच त्याने या विश्वचषकात आत्तापर्यंत 11 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तो एका विश्वचषकात 500 धावा आणि 10 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा विश्वचषक इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

याआधी न्यूझीलंडचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिस यांचा हा विश्वविक्रम थोडक्यात हुकला होता. त्यांनी 2007 च्या विश्वचषकात 499 धावा केल्या होत्या तसेच 9 विकेट्स घेतल्या होत्या.

मंगळवारी झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 314 धावा केल्या होत्या. भारताकडून रोहित शर्माने 104 धावांची शतकी खेळी केली होती. तसेच केएल राहुलने 77 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. बांगलादेशकडून मुस्तफिजूर रेहमानने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर 315 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशकडून शाकिबच्या अर्धशतकानंतर मोहम्मद सैफुद्दीनने नाबाद 51 धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली झूंज दिली होती. पण अन्य फलंदाजांनी विकेट गमावल्याने बांगलादेशला 48 षटकात सर्वबाद 286 धावाच करता आल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.