Home क्रीडा आदर करायला शिका, रवींद्र जाडेजा संजय मांजरेकर यांच्यावर भडकला

आदर करायला शिका, रवींद्र जाडेजा संजय मांजरेकर यांच्यावर भडकला

नवी दिल्ली:

‘मी तुमच्यापेक्षा दुप्पट क्रिकेट सामने खेळले आहेत आणि अजूनही खेळतोय. ज्यांनी काहीतरी कमावले आहे, अशा लोकांचा आदर करायला शिका. मी तुमची फालतू बडबड आतापर्यंत खूप ऐकून घेतली आहे’, अशा शब्दात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडजाने माजी खेळाडू संजय मांजरेकर यांच्यावर हल्ला चढवला आहे. जाडेजाने ट्वीट करत मांजरेकर यांना सुनावले आहे.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये रवींद्र जाडेजाला आतापर्यंत फक्त बदली खेळाडू म्हणून मैदानावर क्षेत्ररक्षण करण्याची संधी मिळाली आहे. आतापर्यंत एकदाही त्याला अंतिम 11 मध्ये जागा मिळालेली नाही. यामुळे त्याची बहिण नैना जाडेजा हिने नाराजी व्यक्त केली होती. दुसरे खेळाडू चांगली कामगिरी करत असताना जाडेजाला का डावलले जात आहे? त्याच्याकडे 10 वर्षांचा अनुभव आहे. आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही तो पहिल्या स्थानावर होता, त्यामुळे त्याच्याकडे होत असलेले दुर्लक्ष अनाकलनीय आहे, असे नैना म्हणाली होती.रवींद्र जाडेजाला संघात स्थान देण्याच्या मागणीवर संजय मांजरेकर यांनी टीका केली होती. एका अशा खेळाडूला मी अंतिम 11 मध्ये पाहू इच्छित नाही जो कधी-कधीच चांगले प्रदर्शन करतो. मला असे खेळाडू आवडत नाही जे ‘हप्त्याने’ (दोन-तीन लढतीनंतर) प्रदर्शन करतात, जसे रवींद्र जाडेजा एक दिवसीय क्रिकेटमध्ये प्रदर्शन करत आहे. तसेच कसोटीमध्ये तो फक्त गोलंदाज आहे, असेही ते म्हणाले होते. त्यांची हिच टीका रवींद्र जाडेजाला झोंबली आहे.