Home बातम्या आंतरराष्ट्रीय पाकिस्तानकडून हाफिज सईदविरोधात मोठी कारवाई; टेरर फंडिंगप्रकरणी गुन्हा दाखल

पाकिस्तानकडून हाफिज सईदविरोधात मोठी कारवाई; टेरर फंडिंगप्रकरणी गुन्हा दाखल

या बैठकीत पाकिस्तानला कर्ज द्यायचे की नाही, याबाबत महत्त्वाचा निर्णय होणार आहे.

इस्लामाबाद: मुंबईवरील २६\११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उल-दवा या दहशतवादी संघटनेचा नेता हाफिज सईद याच्यावर पाकिस्तानकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशतवादविरोधी विभागाने लाहोर, गुजरनवाला आणि मुलतानमध्ये हे गुन्हे दाखल केले आहेत. हाफिज सईद यांच्याशी संबंधित अल-अनफाल ट्रस्ट, दावत उल इरशाद यासारख्या संस्थांच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांसाठी पैसा उभारण्यात आल्याचे सांगितले जाते.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पाकिस्तानमध्ये होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानला अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अर्थसहाय्याची अपेक्षा आहे. या बैठकीत पाकिस्तानला कर्ज द्यायचे की नाही, याबाबत महत्त्वाचा निर्णय होणार आहे. त्यासाठीच्या सर्व अटी-शर्तींची पुर्तता केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता.

याशिवाय, हाफिज सईदसह जमात-उद-दवाच्या चार प्रमुख सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये हाफिज सईदचा मेहुणा अब्दुल रेहमान मक्की, आमीर हमजा आणि मोहम्मद याह्या अझिझ यांचा समावेश आहे. हे सर्वजण छुप्या पद्धतीने दहशतवादासाठी रसद उभारत असल्याचा संशय यंत्रणांना आहे.त्यामुळे पाकिस्तानच्या दहशतवाविरोधी विभागाकडून हाफिज सईदशी संबंधित संस्थांभोवतीचा फास आवळण्यात आला आहे. या सर्व संस्थांवर दहशतवादविरोधी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.