Home ताज्या बातम्या महामार्गावर खड्डे; आमदार नितेश राणेंनी उपअभियंत्याला घातली चिखलाची आंघोळ

महामार्गावर खड्डे; आमदार नितेश राणेंनी उपअभियंत्याला घातली चिखलाची आंघोळ

कणकवली : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबई-गोवा महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने त्रस्त झालेल्या करकवलीकरांच्या रोषाचा फटका आज महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना बसला. महामार्गाच्या दुसवस्थेसाठी शेडेकर यांना जबाबदार धरत आमदार नितेश राणे आणि कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना गडनदीवरील पुलावर बांधून ठेवले. तसेच महामार्गावरून प्रवास करताना सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाचा अनुभव उपअभियंत्यांनाही व्हावा यासाठी आमदार नितेश राणे यांनी त्यांना चिखलाच्या पाण्याने आंघोळ घातली. 

गेल्या काही दिवसांपासून कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच महामार्गाच्या कामामुळे वेळी झालेल्या चुकांमुळे काही दिवसांपूर्वी कणकवलीती बाजारपेठेमध्ये पाणी घुसले होते. दरम्यान, महामार्गावरील चिखल आणि खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी अखेर आज आपला रोष महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यासमोर व्यक्त केला. यावेळी आमदार नितेश राणे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरील पूलापासून जाणवली येथील पुलापर्यंत चालत नेत रस्त्याची वस्तुस्थिती दाखवली. तसेच त्यांना गडनदीवरील पुलाला बांधून ठेवले. त्यानंतर महामार्गाच्या कामामुळे पडलेले खड्डे आणि चिखलासाठी उपअभियंता शेडेकर यांना जबाबदार धरत त्यांना चिखलाची आंघोळ घातली.

महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे जीवित आणि वित्तहानी झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करू,असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी ठेकेदार कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे कणकवलीत पाणी घुसले. त्यामुळे ८३ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी आता हिंम्मत दाखवत ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरण विरोधात गुन्हा दाखल करून पालकमंत्र्यांनी दिलेला आपला शब्द पाळावा. असा टोला कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मंगळवारी लगावला होता.