Home गुन्हा शिवाजीनगर न्यायालयात लाच मागणाऱ्या कनिष्ठ लिपिकाला अटक

शिवाजीनगर न्यायालयात लाच मागणाऱ्या कनिष्ठ लिपिकाला अटक

पुणे : दोषारोपपत्राच्या छायांकित प्रती देण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवाजीनगर न्यायालयातील कनिष्ठ लिपिकाला रंगेहाथ पकडले़. प्रसन्नकुमार गणपतराव भागवत (वय ५०, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) असे त्याचे नाव आहे. आपल्यावर कारवाई होत असल्याचे दिसताच भागवत याने लाचेची रक्कम तोंडात टाकून त्या चावण्याचा प्रयत्न केला़. पण, पोलिसांनी त्या तातडीने ताब्यात घेतल्या़. गेल्या दीड वर्षात शिवाजीनगर न्यायालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली ही तिसरी कारवाई आहे़. त्यामुळे न्यायालयातील भ्रष्टाचार पुन्हा चर्चेत आला आहे. 
 याबाबत बिबवेवाडी येथील ३१ वर्षाच्या व्यक्तीने तक्रार दिली आहे.  तक्रारदारांच्या भावाने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्याची प्रत देण्यासाठी तक्रारदारांना लाच मागण्यात आली. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली़. त्यांच्या तक्रारीची पडताळणी केल्यावर गुरुवारी शिवाजीनगर न्यायालयातील ५ क्रमांकच्या न्यायालयाच्या परिसरात सापळा रचला़ तक्रारदाराकडून दीड हजार रुपये स्वीकारताना भागवत याला पकडण्यात आले़ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. 
 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अपर पोलीस अधीक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त वर्षाराणी पाटील यांनी ही कारवाई केली.