Home बातम्या राष्ट्रीय देशाला पाच ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचा मोदींचा वाराणसीत पुनरुच्चार

देशाला पाच ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचा मोदींचा वाराणसीत पुनरुच्चार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आपल्या वाराणसी या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून, तेथे भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करताना त्यांनी देशाला पाच ट्रिलीयन डॉलरची बनवण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. विकसित होण्यासाठी देश आता अधिक वाट पाहू शकत नाही असे त्यांनी सांगितले.  

वाराणसी येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, ”देश आता विकसित होण्यासाठी फार काळ वाट पाहू शकणार नाही. आता स्वप्ने आणि शक्यतांवर चर्चा होणार आहे. या स्वप्नांपैकीच एक आहे देशाला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भारताची अर्थव्यवस्था दुप्पट करण्याचे स्वप्न आहे. मी अर्थशास्त्रज्ञ नाही, पण आज मी जे लक्ष्य निश्चित केले आहे ते तुम्हालाही विचार करावयास भाग पाडेल. नवीन लक्ष्य नवीन स्वप्नांना घेऊन आम्ही पुढे जाऊ हाच मुक्तीचा मार्ग असेल.”  दरम्यान, आज वाराणसी दौऱ्यावेळी नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी लालबहादूर शास्त्री यांचे पुत्र अनिल शास्त्री उपस्थित होते. तसेच मोदींनी उत्तर प्रदेशमधील वृक्षारोपन अभियानाचीही सुरुवात केली.