Home शहरे नागपूर आईच्या दफनविधीसाठी त्यानं घराच्या अंगणातच खणला खड्डा

आईच्या दफनविधीसाठी त्यानं घराच्या अंगणातच खणला खड्डा

धामणगाव रेल्वे (अमरावती) : वृद्ध आईचा मृत्यू झाल्यानंतर दफनविधीसाठी घरातील अंगणातच खड्डा खणल्याचा प्रकार पोलीस पाटलांच्या तक्रारीनंतर उघडकीस आला. ही घटना तालुक्यातील शेंदूरजना खुर्द येथे घडली.

त्रिवेणीबाई वायलोजी पाटील (७५) असे मृत वृद्धेचे नाव आहे. मानसिकरित्या खचलेल्या तिच्या मुलाने (गिरीधर पाटील, वय ४५ वर्षे) पार्थिवासाठी अंगणात खड्डा खणला. पतीचे निधन व मोठ्या मुलीच्या विवाहानंतर वृद्ध त्रिवेणीबाई आणि मुलगा गिरीधर हे दोघेच घरात राहत होते. गिरीधर यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला. मात्र त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली. शुक्रवारी नजीकच्या धनोडी गावाहून गिरीधर घरी परतला. शनिवारी सकाळी आठच्या दरम्यान तो अंगणात खड्डा खणताना शेजाऱ्यांना दिसला. मात्र, दररोज काम करणाऱ्या वृद्ध त्रिवेणीबाई दिसल्या नाहीत. ही बाब शेजाऱ्यांनी पोलीस पाटील मनीष राजूरकर यांना कळवली. त्यांनी तळेगाव दशासर पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, गिरीधरची आई त्रिवेणीबाई यांचा मृतदेह घरात चटईवर आढळून आला. तर अंगणात २ बाय ३ फुटाचा खड्डा खणल्याचे दिसले. 

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्रिवेणीबाईंचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार असल्याचे तळेगाव दशासर पोलिसांनी सांगितले. चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात त्रिवेणीबाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्रिवेणीबाई यांचा मृत्यू उपासमारीने झाल्याचा प्राथमिक अंदाज तळेगाव दशासर पोलिसांनी वर्तवला आहे. मुलगा गिरीधर हा गतिमंद असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.