Home बातम्या आपत्ती व्यवस्थापन विषयक विद्यार्थी संकल्पना आणि अभिनव नमुना प्रकल्प प्रयोगांचे लक्षवेधी सादरीकरण

आपत्ती व्यवस्थापन विषयक विद्यार्थी संकल्पना आणि अभिनव नमुना प्रकल्प प्रयोगांचे लक्षवेधी सादरीकरण

  सर्वच महाविद्यालयीन विद्यार्थी समुहांनी सादर केलेले आपत्ती व्यवस्थापन विषयक नमुना प्रयोग प्रकल्प अत्यंत अभिनव होते व या अभिनव प्रकल्पांचा उपयोग आपत्ती काळात प्रभावी रितीने होईल असा विश्वास व्यक्त करीत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी प्रकल्प सादरीकरण करताना विद्यार्थ्यांच्या मनात असलेली समाजाच्या हितासाठी काहीतरी चांगले काम करायचेय ही तळमळीची भूमिका प्रशंसनीय असल्याचे मत मांडले.

      नवी मुंबई महानगरपालिका आणि युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (यू.एन.डी.पी.) यांच्या संयुक्त विद्यमाने अभियांत्रिकी महाविदयालयातील पदवी, पदविका विदयार्थ्यांमधील कल्पकतेला व्यासपीठ मिळवून देऊन त्यांच्या संकल्पनेतून आपत्ती व्यवस्थापन विषयक नमुना प्रयोगांची निर्मिती व्हावी याकरिता आयोजित करण्यात आलेल्या “आपत्ती व्यवस्थापन विषयक विदयार्थी संकल्पना आणि नमुना प्रयोग स्पर्धा” यामधील निवडक नमुना प्रकल्प प्रयोग सादरीकरण प्रसंगी आयुक्तांनी विद्यार्थ्यांच्या कृतीशीलतेचे कौतुक केले. 

      याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र पाटील, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहा. आयुक्त श्री. प्रकाश वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. धनवंती घाडगे व डॉ. उज्वला ओतुरकर, कार्यकारी अभियंता श्रीम. शुभांगी दोडे व श्री. मनोहर सोनवणे, यू.एन.डी.पी. च्या शहर प्रकल्प समन्वयक श्रीम. वृंदा नाथ आणि इतर अधिकारीवर्ग तसेच अंतिम निवड झालेल्या तंत्र महाविद्यालयांचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.  

      युवकांमधील नाविन्याची आवड वृध्दिंगत करणे तसेच त्यांच्यामधील सृजनशीलतेला मुक्त वाव देऊन त्याचा उपयोग आपत्ती धोके निवारण कार्यात करुन घेणे या उद्देशाने देशात पहिल्यादाच आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या स्पर्धेमध्ये नवी मुंबईसह, ठाणे पनवेल, मुंबई येथील विविध अभियांत्रिकी महाविदयालयांतील 54 विदयार्थी समुहांनी प्रस्ताव दाखल केले होते. यामध्ये – पूर, भूस्खलन, आग लागणे, औदयागिक / रासायनिक आपत्ती, रस्ते अपघात, भूकंप, उष्माघात, दुष्काळ, पर्यावरण हानी, वायू-जल-भू प्रदूषण तसेच हवामान बदल अशा विविध प्रकारच्या आपत्ती प्रसंगी करावयाच्या तांत्रिक उपाययोजना नमुना प्रयोग स्वरूपात सादर करण्यास सूचित करण्यात आले होते.

      या अनुषंगाने प्राप्त झालेल्या 54 प्रस्तावांची तपासणी व गुणांकन करण्यात आले. प्रस्तावांचे गुणांकन करताना संकल्पनेतील नाविन्य : 25 गुण, आपत्ती व्यवस्थापनाला लाभदायकता : 25 गुण, शहराशी संदर्भित : 25 गुण आणि तांत्रिक तपशील : 25 गुण अशा बाबींचा विचार करण्यात आला. त्यामधून 11 प्रस्तावांची निवड करण्यात येऊन त्यांना सादरीकरण करण्यास सूचित करण्यात आले. यामध्ये सादरीकरणास सकारात्मकता दर्शविणा-या 6 समुहांना नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नमुना प्रकल्प प्रयोग विकसित करण्याचे सूचित करण्यात आले व याकरिता रु. 50 हजार इतकी रक्कम प्रदान करण्यात आली. त्या अनुषंगाने विद्यार्थी समुहांनी तयार केलेल्या नमुना प्रकल्प प्रयोगांचे प्रत्यक्ष सादरीकरण महापालिका आयुक्त यांच्या समक्ष करण्यात आले.

????????????????????????????????????

      यामध्ये – आय.आय.टी. मुंबई यांनी ‘पोर्टेबल ऑपरेशन रूम फॉर डिझास्टर अफेक्टेड एरिया’ या मोठ्या प्रमाणावर होणा-या आपत्ती प्रसंगात त्या ठिकाणीच करावयाच्या तातडीच्या शस्त्रक्रियांसाठी ने-आण करणे व वापर करणे सोपे असणा-या अत्यंत उपयोगी अशा नमुना प्रकल्पाचे सादरीकरण केले. विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज् इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, चेंबुर यांनी ‘लेक क्लिनींग’ हा प्रकल्प प्रयोग, रामराव आदिक इन्स्टिट्युशन ऑफ टेक्नॉलॉजी डी.वाय.पाटील महाविद्यालय नेरूळ यांनी ‘ह्युमन डिटेक्टर – स्नेक रोबोट’ हा प्रकल्प प्रयोग, एम.एच. साबु सिध्दीकी कॉलेज ऑफ इंजि. यांच्या दोन विद्यार्थी समुहांनी स्वतंत्रपणे ‘ह्युमन रेस्क्यु रोबोट’ तसेच ‘हॅझार्डस् मटेरिअल डिटेक्शन युजींग रासबेरी पीआय’ असा रासायनिक आपत्ती विषयक प्रकल्प प्रयोग वेगवेगळे सादर केले. एसआयईएस, नेरूळ येथील विद्यार्थी समुहाने ‘ॲक्सिडन्ट मिटिगेटर’ असा अपघातप्रसंगी संदेश प्रसारणाचा कल्पक प्रयोग प्रकल्प सादर केला.

      सर्वच नमुना प्रकल्प प्रयोगांचे सादरीकरण त्यांच्या अभिनव संकल्पनांइतकेच प्रभावी होते. यामधील भिंत कोसळणे, भूस्खलन अशा प्रकारच्या मातीच्या ढिगा-यांखाली असलेल्या माणसांना शोधण्याकरिता करावयांच्या उपाययोजनात्मक यंत्रसामुग्रीबाबत सादर झालेल्या दोन प्रकल्पांतील उपयोगी गोष्टींचे एकत्रीकरण करून अधिक उपयोगी व प्रभावी प्रकल्प प्रयोग निर्माण होऊ शकतो असे सूचित करीत आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून युवक विद्यार्थ्यांच्या अत्यंत उत्तम संकल्पना महाविद्यालयाच्या चार भिंतींच्या बाहेर याव्यात व त्याचा समाजासाठी उपयोग व्हावी ही स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.