Home ताज्या बातम्या चंद्रपूर जिल्ह्यातील नांदाफाटा पाणी पुरवठा योजना तत्काळ पूर्ण करा – बबनराव लोणीकर

चंद्रपूर जिल्ह्यातील नांदाफाटा पाणी पुरवठा योजना तत्काळ पूर्ण करा – बबनराव लोणीकर

मुंबई : जलस्वराज्य प्रकल्प-2 अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यामधील नांदाफाटा पाणी पुरवठा योजनेसाठी 902.55 लाख रु. मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेला प्रशासकीय मान्यता देवून जवळपास दोन माहिने उलटुन ही कामाची गती कमी असल्याचे निदर्शनास आल्यामुळे नांदाफाटा पाणी पुरवठा योजनेचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.

आज मंत्रालयात याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री.लोणीकर बोलत होते. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, उपसचिव अभय महाजन  व विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री.लोणीकर म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यामधील नांदाफाटा पाणी पुरवठा योजनेतील जलशुध्दीकरण केंद्र 3.50 द.ल.ली. क्षमतेचे असून भौतिक प्रगती 90% आहे. तर पाण्याच्या टाकीची क्षमता 5.07 लक्ष लिटर्स आहे. 70 लिटर प्रती माणसी प्रतिदिन एवढे पाणी वर्षभर नागरिकांना उपलब्ध होणार आहे. घरगुती नळ जोडणी 15 मिमी.व्यास आहे. या योजनेमुळे सर्व नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेची तत्काळ अंमलबाजावणी करण्याचे निर्देश श्री. लोणीकर यांनी दिले.