Home ताज्या बातम्या पावसाळ्यामध्ये केसांसाठी ‘हे’ मास्क वापरून तुम्हीही म्हणाल, हाय…ये रेशमी जुल्फे…

पावसाळ्यामध्ये केसांसाठी ‘हे’ मास्क वापरून तुम्हीही म्हणाल, हाय…ये रेशमी जुल्फे…

पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये ओलावा असतो. यामुळे आरोग्यासोबतच त्वचेवर आणि केसांवरही परिणाम होतो. मान्सूनमध्ये अनेक महिला केस गळतीच्या समस्यांनी हैराण होतात. त्याचप्रमाणे केस चिकट होण्यापासून केसांतील कोंड्याच्या समस्येनेही हैराण होतात. मग अशावेळी बाजारात मिळणाऱ्या अनेक उत्पादनांचा आधार घेतला जातो. पण याऐवजी काही घरगुती उपाय केसांच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुम्ही घरात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांपासून केसांसाठी हेल्दी ठरणारे हेअर मास्क तयार करू शकता.

कोरफड आणि कडुलिंबाचा हेअर मास्क

कोरफड 30 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर त्यातील गर काढा आणि कडुलिंबाची पानं वाटून घेवून त्यामध्ये कोरफडीचा गर एकत्र करा. तयार मास्क केसांच्या मुळांपासून संपूर्ण केसांना लावा. त्यानंतर माइल्ड शॅम्पूचा वापर करून केस स्वच्छ करा. यामुळे फक्त केसांचा चिकटपणा दूर कोणार नाही तर केसांच आरोग्य राखण्यासाठीही मदत होईल.

खोबऱ्याचं तेल आणि दही

अर्धा कप दह्यामध्ये पाच चमचे खोबऱ्याचं तेल एकत्र करा. त्यामध्ये पाच थेंब लिंबाचा रस एकत्र करा. तयार मिश्रण केसांच्या मुळांना लावा आणि अर्ध्या तासानंतर हेअर वॉश करून घ्या. तयार मास्क केसांची चमक वाढविण्यासाठी आणि केसांतील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो.

अवोकाडो आणि केळी

अवोकाडोची साल काढून घ्या आणि त्यातील आतील भाग एखा बाउलमद्ये काढून घ्या. त्यामध्ये साल काढलेलं केळी स्मॅश करून घ्या आणि दोन चमचे मध एकत्र करा. व्यवस्थित एकत्र करून स्मूद पेस्ट तयार करा. त्यानंतर ब्रशच्या मदतीने केसांच्या मुळाशी तयार पेस्ट लावा. तयार मास्कमुळे केसांच्या हेअर फॉलची समस्या रोखण्यासाठी मदत मिळते. एवढचं नाहीतर हे मास्क केसांच्या मजबुतीसाठीही फायदेशीर ठरतं.

आवळा आणि कडुलिंब

आवळा पाण्यामध्ये उकडून वाटून घ्या. यामध्ये कडुलिंबाची पानं वाटून एकत्र करा आणि स्मूद पेस्ट तयार करा. आता मास्क केसांवर लावा. 20 ते 30 मिनिटं ठेवल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून जवळपास तीन वेळा हा पॅक केसांना लावा. हा मास्क केसांची चमक वाढविण्यासोबतच त्यांच्या मजबुतीसाठीही फायदेशीर ठरतो.

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.