मुंबई : मध्य रेल्वेच्या स्थानकांवरील खाद्यपदार्थ स्टॉलवर आता ‘नो बिल, नो पेमेंट’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पावती घेतल्याशिवाय ग्राहकांनी पैसे देऊ नयेत, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मध्य रेल्वे स्थानकांवरील विक्रेत्यांकडून घेण्यात आलेली वस्तू योग्य दरात मिळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक स्टॉलवर ‘नो बिल, फूड फ्री’ असे फलक लावण्याची सक्ती विक्रेत्यांना केली आहे. पावती दिली नाही, तर संबंधित विक्रेत्यावर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.
अनेक जण मनमानीपणे हे स्टॉल चालवतात. ग्राहकांना पावती न देताच खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. त्यामुळे यात गैरव्यवहार होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात अनेकदा ग्राहकांनीही तक्रारीची सूर आळवला होता. त्याची दखल घेत अशाप्रकारे मनमानी तसेच गैरव्यवहार होऊ नयेत, त्यांना आळा बसावा यासाठीच खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर पावती घ्या मगच पैसे द्या, असा ग्राहक हिताचा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
लांब पल्ल्यांंच्या मेल, एक्स्प्रेसमध्ये कार्डद्वारे व्यवहार
लांब पल्ल्यांंच्या मेल, एक्स्प्रेसमधून अधिकृत विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी केल्यास आता कार्ड किंवा आॅनलाइन बँकिंग सुविधेद्वारे व्यवहार करता येणे शक्य झाले आहे. यामुळे कॅशलेस व्यवहा होत असून यातून प्रवाशांना बिलदेखील मिळेल.