Home गुन्हा तलाठी परिक्षेत डमी उमेदवार प्रकरणी दोघांवर एफआयआर दाखल

तलाठी परिक्षेत डमी उमेदवार प्रकरणी दोघांवर एफआयआर दाखल

सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय अंतर्गत रिक्त असलेल्या तलाठी संवर्गातील पदांच्या परीक्षेदरम्यान आदर्श इंजिनिअरींग टेक्नीकल कॉलेज विटा येथे संगनमताने डमी परीक्षार्थी बसवल्या प्रकरणी दोघांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बिरूदेव सुभाष कुलाळ, येळावी ता. जत आणि रामहरी शंकर जंगम रा. कडेगाव, ता. कडेगाव अशी आरोपींची नावे आहेत.

दिनांक 2 जुलैपासून 26 जुलै 2019 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने परीक्षा सुरू आहे. ही परीक्षा सांगली जिल्ह्यातील आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी, आष्टा व आदर्श इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड रिसर्च, विटा या दोन केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने महा-आयटी विभागाच्या माध्यमातून ई-महापरीक्षा मार्फत राबवण्यात येत आहे.  या प्रकरणी परीक्षा समन्वयक सुरेश शिवलींग पाटील यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार सुरेश पाटील हे मिरज प्रांत ऑफिस येथे नेटवर्क इंजिनिअर म्हणून महाआयटी कंपनीकडून काम करीत आहेत. तलाठी परीक्षा समन्वयक म्हणून त्यांची नेमणूक आहे. आदर्श इंजिनिअरींग टेक्नीकल कॉलेज विटा येथे त्यांनी 261 परीक्षार्थींचे हॉल तिकीट व ओळखपत्र तपासणी करून परीक्षेकरीता आत सोडले होते.

दरम्यान परीक्षा सुरू झाल्यानंतर बिरूदेव सुभाष कुलाळ यांच्या नावावर डमी परीक्षार्थी बसल्याची शंका पर्यवेक्षक पी. आर. थोरात यांनी पाटील यांच्याकडे व्यक्त केली. यावर केंद्रचालक, परीक्षा निरीक्षक यांच्यासमवेत तपासणी केली असता बिरूदेव कुलाळ यांचे छायाचित्र असणारे हॉल तिकीट असणारी वस्तू आढळून आली. त्याला ओळखपत्राबाबत विचारणा केली असता त्याने स्वत:चे ओळखपत्र काढून दाखविले.

वाहन चालक परवान्यावर त्याचे नाव रामहरी शंकर जंगम असे असल्याचे आढळून आले. याबाबत रामहरी जंगम यांच्याकडे विचारणा केली असता बिरूदेव कुलाळ हा मित्र असल्याने आपण त्याच्या जागी त्याचे मूळ हॉल तिकीट व ओळखपत्र घेऊन परीक्षेसाठी बसलो असे सांगितले. या दोघांनी संगनमत करून बिरूदेव कुलाळ हा तलाठी परीक्षा पास होण्याच्या उद्देशाने रामहरी जंगम डमी परीक्षार्थी म्हणून बसले.