Home बातम्या राष्ट्रीय मासिक पाळीत सुटी द्यावी लागू नये म्हणून ‘या’ कंपन्या देतात पेनकिलर्स

मासिक पाळीत सुटी द्यावी लागू नये म्हणून ‘या’ कंपन्या देतात पेनकिलर्स

तामिळनाडूतल्या काही कापड कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांची पाळी सुरू असताना त्यांना देण्यात येणाऱ्या पेन किलर (वेदनाशामक) गोळ्या देण्यात येतात. त्याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

कोईमतूर, तिरुप्पुर आणि दिंडीगलमध्ये अनेक टेक्स्टाईल उद्योग आहेत. म्हणूनच तामिळनाडूमधल्या अनेक गावांमधले आणि उत्तरेकडील राज्यांमधूनही लोक इथे येऊन राहतात आणि इथल्या कारखान्यांत काम करतात.

या कारखान्यांमध्ये अनेक महिला कर्मचारी काम करतात. पाळी सुरू असताना होणाऱ्या वेदनांवर मात करण्यासाठी त्यांना वेदनाशामक औषधं देण्यात येतात.

पाळी सुरू असताना आराम करणं वा सुटी घेणं शक्य नसतं म्हणून मिलमध्ये काम करणाऱ्या महिला अशा गोळ्या सर्रास घेतात.

पण या गोळ्या देताना कोणत्याही नियमांचं पालन न केल्याने किंवा डॉक्टरच्या सल्ल्यानुसार गोळ्या देण्यात न आल्यामुळे मासिक पाळीच्या चक्रामध्ये अडथळे येत असल्याचं थॉमस रॉयटर्स फाऊंडेशनने उघडकीला आणलं आहे.

टेक्स्टाईल मिल्समध्ये काम करणाऱ्या या महिलांसोबत बीबीसी तामिळने संवाद साधला. 26 वर्षांची जेनी ही दिंडीगल जवळच्या गावातली आहे. ती इथल्या स्पिनिंग मिलमध्ये काम करते.

“मला पाळीच्या वेळी नेहमीच खूप वेदना होतात. म्हणूनच मी पाळी सुरू झाली की मी लगेच मिलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या गोळ्या घेते. मी बाहेरून विकत घेतलेली पेनकिलर औषधंही घेतली आहेत. पण मिलकडून देण्यात आलेल्या गोळ्यांइतका त्यांचा परिणाम होत नाही. म्हणूनच मी मिलमधून देण्यात आलेल्या गोळ्या घ्यायला प्राधान्य देते.

हल्ली पाळी दरम्यान मला रक्तस्रावही खूप कमी होतो. मला पूर्वी 3 दिवस रक्तस्राव होत असे. पण हल्ली फक्त एकच दिवस होतो. म्हणून आता मी या गोळ्या घेणं थांबवलंय. मी आता डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार घेत आहे,” ती सांगते.

“मिलमध्ये देण्यात येणाऱ्या गोळ्यांना वेष्टण नसतं. म्हणून मला त्या गोळ्यांचं नाव माहिती नाही. काम करत असताना पाळी सुरू झाली, तर आम्हाला घरी परतता येत नाही.

जर आम्ही घरी आलो तर त्या दिवसाच्या कामाचे 300 रुपये जातात. आम्ही विश्रांती घेऊ शकत नाही किंवा मशीन थांबवू शकत नाही. म्हणून मग मी गोळी घेऊन काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न करते,” कमला ज्योती सांगतात.

“माझ्या अनेक महिला सहकाऱ्यांची पाळी उशीरा येते किंवा त्यांचा गर्भपात होतो. या गोळ्यांमुळे अशा समस्या निर्माण होतात का ते माहीत नाही. पण हे त्यानेच होत असल्याची भीती आम्हाला आहे, म्हणून मी आता या गोळ्या घेण्याचं प्रमाण कमी केलं आहे.

“आम्ही या गोळ्या घेतल्या तर रक्तस्राव कमी होतो. 3-4 दिवसांऐवजी फक्त 2 दिवसच पाळी येते. माझ्यासोबत काम करणाऱ्या लग्न न झालेल्या काही मुलीही या गोळ्या घेतात. त्या परिणामांचा विचार करत नाहीत. त्या फक्त आत्ता सुटी घेणं कसं टाळता येईल याचा विचार करत आहेत.

“आठवड्याची सुटी सोडून इतर सगळ्या दिवशी काम केलं तर आम्हाला 1000 रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळतो. तो मिळावा म्हणून आणि रोजचे पैसे बुडू नयेत म्हणून या पेनकिलर गोळ्या गरजेच्या आहेत,” त्या पुढे सांगतात. पण जर पाळीच्या काळात थोडीशी विश्रांती घेण्याची तरतूद केली तर गोळ्या घेण्याचं प्रमाण कमी होईल असं त्यांना वाटतं.

घरी राहून कामावर येणाऱ्यांपेक्षा हॉस्टेलमध्ये राहाणाऱ्यांना जास्त अडचणी येतात. सुटी घेण्याचा पर्याय उपलब्ध नसल्यानं त्यांना या गोळ्या घ्याव्याच लागतात.

“आम्ही जर या गोळ्या वरचेवर घेतल्या तर 4-5 महिने पाळी येत नाही. पाच महिन्यांनंतर भरपूर जास्त रक्तस्राव होतो आणि खूप दुखतं. म्हणून मी घाबरून या गोळ्या घेणं थांबवलं.

खरंतर पूर्ण दिवस सुटीचीही गरज नाही. भरपूर दुखत असताना जर तासभर विश्रांती घेता आली तरी पुरेल,” 21 वर्षांची विमला सांगते. ती पुढे म्हणते की कंपनीने फक्त गेले 3 महिने गोळ्या दिलेल्या नाहीत.

तामिळनाडू टेक्स्टाईल युनियनच्या नेत्या दिव्या म्हणतात, “गोळ्या देण्याची ही पद्धत फार पूर्वीपासून आहे. पण त्याचे परिणाम मात्र आताच कळायला लागले आहेत. या गोळ्या देणाऱ्यांना वैद्यकीय ज्ञान नाही. ज्या गोळ्या दिल्या जातात, त्यांना वेष्टण नसतं. या दोन्ही गोष्टी चूक आहेत.

सगळ्याच महिलांना पाळी दरम्यान त्रास होत नाही. अशावेळी ज्या महिलांना त्रास होतोय त्यांना शिफ्ट बदलण्यासारखा पर्याय मिळत नाही. म्हणून मग त्यांना गोळ्या घ्याव्याच लागतात.”

“त्या जेव्हा कामातून सुटी मागतात किंवा थोडी विश्रांती मागतात, तेव्हा त्यांना गोळ्या घेऊन काम करायला सांगण्यात येतं. आमच्या युनियनच्या सचिव असणाऱ्या बाई आता मूल होत नसल्याने वैदयकीय उपचार घेत आहेत. मिलमध्ये देण्यात येणाऱ्या या गोळ्या त्यांनी वरचेवर घेतल्या होत्या. आणि या गोळ्यांचेच हे दुष्परिणाम असल्याची त्यांना भीती वाटतेय.

अनेक महिला कामगार या अॅनिमियाग्रस्त आणि कुपोषित आहेत. या गोळ्या घेतल्याने त्यांना या तब्येतीच्या समस्या उद्भवल्या आहेत.”

दक्षिण भारतीय मिल्स असोसिएशनचे प्रमुख सेल्वाराजू म्हणतात, “पाळीच्या वेळी महिलांना कशाप्रकारची वागणूक देण्यात यावी, याविषयी उच्च न्यायालयाचे नियम आहेत. तामिळनाडू सरकार, सायमा आणि टास्मा यासारख्या संस्थांनी याविषयी कामगारांना अनेकदा माहिती दिली आहे.

कोणीही या नियमांचं उल्लंघन करू शकत नाही. त्यामुळे असं काही घडण्याची शक्यताच नाही. आणि जर असं घडलं असेल आणि या लोकांची आमच्याशी बोलायची तयारी असेल तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत.”

याविषयीचा अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या थॉमस रॉयटर्स फाऊंडेशनने आपण या गोळ्यांची तपासणी केली नसल्याचं म्हटलं आहे. या गोळ्यांवर वेष्टण किंवा नाव नसल्याने या गोळ्या मिल कामगार महिलांकडून घेण्यात आल्या. या गोळ्यांमध्ये आयबुफ्रेन (Ibuprofen) चे अंश असल्याचं आढळून आलं. हा NSAID चा प्रकार आहे.

अशा प्रकारच्या स्टिरॉईड वेदनाशामक गोळ्या घेतल्याने गर्भधारणेसाठी अडचणी येऊ शकतात का किंवा इतर काही परिणाम होतात का हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. म्हणून आम्ही कोईमतूरच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रजनी यांच्याशी बोललो.

त्यांनी सांगितलं की, “पेनकिलर घेतल्याने गर्भधारणेला अडचणी येतात असं म्हणता येणार नाही. NSAID प्रकारचं कोणतंही पेनकिलर पाळी दरम्यान रक्तस्राव कमी करतं.”

“कोईमतूरमध्ये अनेक कारखाने आहेत. यामध्ये काम करणाऱ्या अनेक महिला उपचारांसाठी येतात. यातल्या बहुतेक महिला सकाळी न्याहारी करत नाहीत. त्या फक्त चहा-बिस्कीट खाऊन निघतात. बिस्किटात फक्त मैदा आणि साखर असते. पोषकतत्त्वं नसतात.

कामाच्या ठिकाणी त्यांना अनेक अडचणी येतात, तणाव असतो, आर्थिक अडचणी असतात. यामुळे तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. म्हणून महिलांना भेडसावणाऱ्या या सामाजिक, मानसिक अडचणी लक्षात घेऊन मग ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा,” त्यांनी पुढे सांगितलं.