Home शहरे मुंबई इतिहासाचा जाणकार हरपला; पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांचं निधन

इतिहासाचा जाणकार हरपला; पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांचं निधन

ठाणे: भारतीय इतिहासाची जपणूक करण्यात आयुष्य वेचणाऱ्या पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज सकाळी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअममध्ये (आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) सहाय्यक अभिरक्षक म्हणून १९६४ मध्ये त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली. संग्रहालय शास्त्रातील डॉक्टरेटदेखील त्यांनी मिळवली. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच कोकणातील देवरूखमध्ये लक्ष्मीबाई पित्रे कला संग्रहालय साकारलं गेलं. या ठिकाणी इंग्रजांच्या काळातील बॉम्बे स्कूल ऑफ आर्टच्या शैलीतील चित्रकलेचे अत्यंत दुर्मिळ नमुने संरक्षित करण्यात आले आहेत.

गोरक्षकर यांनी व्यापक लिखाण केलं. राजभवन्स इन महाराष्ट्र, अ‍ॅनिमल्स इन इंडियन आर्ट, द मॅरिटाइम हेरिटेज ऑफ इंडिया, कार्ले केव्हस ऑफ वेस्टर्न इंडिया, कालिदास अँड द महायोगी ऑफ घारापुरी ही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. पश्चिम भारतातील गुप्तकालीन शिल्पकलेवरही त्यांनी लेखन केलं. या कार्याबद्दल 2003 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.