Home ताज्या बातम्या गोरेगाव घटनेची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश ; आदित्य ठाकरेंकडून दखल

गोरेगाव घटनेची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश ; आदित्य ठाकरेंकडून दखल

मुंबई : मालाड येथील आंबेडकर चौक परिसरात गटारात पडून वाहून गेलेला चिमुकला दिव्यांश अद्याप सापडलेला नाही. पालिका, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण कक्ष आदी पथकाने त्याच्या शोधासाठी राबवलेली मोहीम शुक्रवारी रात्री उशिरा थांबविली. दोन दिवस उलटूनही दिव्यांशचा शोध लावण्यात यश आले नसल्याने नागरिकांकडून मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त करण्यात येत आहे . या घटनेची दखल घेत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ही घटना दु:खद असल्याचे म्हटले आहे.

ही घटना खरंच दु:खद आहे. ही घटना कशामुळे घडली याची चौकशी होणे गरजेचे आहे. गटारे, मॅनहोल्स बंद असायला हवीत. त्यांच्यावर जाळी असायला हवी. त्या ठिकाणी गटार बंदही नव्हते आणि जाळीही नव्हती. त्याची चौकशी करुन ती कुणामुळे आणि का घडली याचा तपास झाला पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी, असे आदित्य ठाकरे म्हणाले . माहितीनुसार , दिव्यांशचे वडील काही कामानिमित्त घराबाहेर गेले असता त्यांच्या मागे दिव्यांशही गेला. वडील रस्त्यावर कुठे दिसले नाहीत म्हणून तो फिरत असतानाच उघडय़ा गटारात पडला. दिव्यांश कुठे न दिसल्याने जवळच असलेल्या मशिदीबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सीसीटीव्हीमध्ये दिव्यांश गटारात पडल्याचे समजताच पोलीस, पालिका अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले. पालिका, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण कक्ष आदी पथकाने त्याच्या शोधासाठी राबवलेली मोहीम शुक्रवारी रात्री उशिरा थांबविली. दोन दिवस उलटूनही दिव्यांशचा शोध लावण्यात यश आले नसल्याने नागरिकांकडून यंत्रणांविरोधात संताप व्यक्त होत आहे. तर समाज माध्यमांवर पालिकेच्या निष्काळजीवर टीका व्यक्त होत आहे.