Home शहरे नाशिक अंगणवाड्यांमध्ये ग्राम बालविकास केंद्र सुरू

अंगणवाड्यांमध्ये ग्राम बालविकास केंद्र सुरू

नाशिक : पावसाळ्यात ग्रामीण व दुर्गम भागात कुपोषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, यंदाही कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्याचे निर्देश तालुक्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार सोमवारपासून अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आले असून, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांच्या उपस्थितीत ग्राम बालविकास केंद्रांचे उद््घाटन करण्यात आले.
ग्राम बालविकास केंद्रात दाखल करण्यात येणारे प्रत्येक तीव्र कुपोषित बालक सर्वसाधारण पोषण श्रेणीत आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने सर्वंकष प्रयत्न करण्यात येणार असून, त्याचाच भाग म्हणून सोमवारी बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथे जिल्हा परिषद सदस्य रेखा पवार यांच्या हस्ते ग्राम बालविकास केंद्राचे उद््घाटन झाले. त्याचप्रमाणे नाशिक तालुक्यातील जातेगाव, मातोरी, दुगाव, सावरगाव, धोंडेगाव, गोवर्धन, नांदगाव तालुक्यातील हिसवळ बु।। आदी ठिकाणी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रामार्फत बालकांना अतिरिक्तआहार पुरवठा, वैद्यकीय देखरेख, पालकांचे पोषणविषयक समुपदेशन या पायाभूत गोष्टींवर भर देण्यात येणार आहे. या उपक्रमाची आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी मागील वर्षी जिल्ह्यात तीन स्तरावर प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहेत. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षक यांच्यामार्फत तालुका व प्राथमिक स्तरावरील आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
यावर्षीही आरोग्य विभागाच्या वतीने बालकांच्या तपासणीचे नियोजन करण्यात येऊन ० ते ६ वयोगटांतील बालकांची वजन, उंची, दंडघेर, पायावरील सूज या निकषावर पडताळणी करण्यात येऊन त्यामध्ये तीव्र कुपोषित आढळून येणाऱ्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात प्रवेश देण्यात येत आहे.
वेळापत्रकानुसार देणार आहार
ग्राम बालविकास केंद्रांमार्फत बालकांना अतिरिक्त आहार पुरवठा, वैद्यकीय देखरेख, पालकांचे पोषणविषयक समुपदेशन या पायाभूत गोष्टींवर भर देण्यात येणार असून, केंद्रात शासनाकडून आखून देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार आहार व औषध देण्यात येणार आहे.