Home शहरे जळगाव घरकुल घोटाळ्याचा १ ऑगस्ट रोजी निकाल?

घरकुल घोटाळ्याचा १ ऑगस्ट रोजी निकाल?

पूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या जळगाव घरकुल घोटाळा खटल्याच्या निकालाची सुनावणी सोमवारी (दि. १५) सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता १ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली असून, न्यायमूर्ती डॉ. सृष्टी निळकंठ यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायालयात सोमवारी करण्यात आले. त्यावेळी खटल्याचा निकाल तयार नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलली. 

जळगावच्या घरकुल घोटाळ्यात अनेक बडे नेत्यांचा समावेश असून, अनेक दिवसांपासून ही सुनावणी पुढे ढकलण्यात येत आहे. या अगोदर चारवेळेस निकाल पुढे ढकलण्यात आला होता. सोमवारी (दि. १५) या खटल्याचे धुळे न्यायालयात झाले मात्र, याची पुढील सुनावणी आता १ ऑगस्ट रोजी होणार असून, त्यावेळी निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच आरोपींनी हजर राहावे अशी माहिती संशयित आरोपींचे वकील जितेंद्र निळे यांनी दिली. या खटल्यात माजीमंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर, राजा मयूर, प्रदीप रायसोनी, जगन्नाथ वाणी यांच्यासह ५२आरोपी आहेत. यातील तीन आरोपी मृत झाले असून एक आरोपी फरार आहे. न्या. सृष्टी निळकंठ यांच्यासमोर खटल्याचे कामकाज झाले त्यावेळी या खटल्यातील सर्व ४८ संशयित आरोपी हजर होते. जळगाव घरकुल घोटाळा खटल्याचा निकाल अजून तयार झालेला नसल्याने पुढील तारीख देण्यात आली आहे, असेही बचाव पक्षाचे वकील निळे यांनी सांगितले. दरम्यान, १ ऑगस्ट रोजी जर निकाल लागणार नसेल तर त्याबाबत संबंधित वकिलांना तीन दिवसांआधी कळविण्यात येणार असल्याची माहिती अॅड. निळे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.