बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रासह बॉटनिकल गार्डनच्या कामाला वेग द्यावा – विकास खारगे

- Advertisement -

मुंबई: चंद्रपूर येथील वन प्रशासन व विकास व्यवस्थापन अकादमीचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील महिन्यात लोकार्पण करण्याच्यादृष्टीने वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी आज मंत्रालयात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि विसापूर येथील बॉटनिकल गार्डनच्या कामांना वेग देण्याचे निर्देश दिले.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने साकारण्यात येत असलेल्या वन प्रशासन व विकास व्यवस्थापन अकादमी चंद्रपूर, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली आणि बॉटनिकल गार्डन विसापूर आदी संदर्भात वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.

सर्वाधिक जंगल, व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्य विदर्भात येत असल्याने भविष्यात चंद्रपूर येथील वन प्रशासन व विकास व्यवस्थापन अकादमी अतिशय महत्त्वाची व वन खात्याची शिखर संस्था म्हणून नावारूपास येईल असे सांगून श्री. खारगे म्हणाले, या अकादमीच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण वर्ग, इतर कोर्सेस याचे एक उत्तम मॉडेल व्हावे यादृष्ट्रीने अकादमीचे काम दर्जेदार करण्यावर भर द्यावा.

स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्टला वन अकादमीचे लोकार्पण करण्याचे नियोजन केले जात असल्यामुळे प्रेक्षकगृह, क्लासरूम, संकुल, वन विश्रामगृह, तरण तलाव, यासह ११ कामांची माहिती देत अकादमीचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे अशी माहिती प्रधान मुख्यवनसंरक्षक जीत सिंग यांनी दिली. यावेळी अकादमीमध्ये पाणी आणि वीज पुरवठ्याची कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रधान सचिवांनी दिले.

विसापूर येथे तयार होत असलेल्या बॉटनिकल गार्डनबाबत मुख्यवनसंरक्षक रामाराव यांनी कंझर्वेशन झोन आणि रिक्रियेशन झोन च्या संकल्पनांचे सादरीकरण केले. भूमिगत संग्रहालय, प्रवेशद्वार, फुलपाखरू उद्यान,मत्स्यालय, प्रशासकीय इमारत, उपहारगृह,  पथदिवे, प्रदर्शन केंद्र आणि साहित्य इत्यादी कामांचा आढावा श्री. खारगे  यांनी यावेळी घेतला तसेच ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाचा ही आढावा घेण्यात आला.

या बैठकीला प्रधान मुख्यवनसंरक्षक विवेक गोगटे, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्यवनसंरक्षक अनुराग चौधरी, अपर प्रधान मुख्यवनसंरक्षक डॉ. दिनेशकुमार त्यागी, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे टी.एस.के रेड्डी, अनंत भास्करवार, मंत्रालय अपर प्रधान मुख्यवनसंरक्षक वीरेंद्र तिवारी,  यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित  होते.

देशातील पहिलेच बांबू संशोधन केंद्र…बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे पुढील महिन्यात सुरु होणार आहे. बांबूपासून या केंद्राची इमारत बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. अशाप्रकारे बांधली जात असलेली ही आशिया खंडातील पहिली इमारत असून, देशातील हे पहिले बांबू संशोधन केंद्र असणार आहे. युवक-युवतींना या केंद्रामध्ये बांबूपासून निर्माण होणा-या विविध कलाकृतींचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासोबतच राज्यातील विविध बांबूच्या प्रजातींवर येथे संशोधन केले जाणार आहे. हे केंद्र सध्या छोट्या स्वरुपात चंद्रपुरात सुरू झालेले आहे.
- Advertisement -