Home बातम्या जर्मनीतील आंतरराष्ट्रीय महोत्सव

जर्मनीतील आंतरराष्ट्रीय महोत्सव

महाराष्ट्रातील कला, संस्कृती व पाककृतीस

जर्मन पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : जर्मनीतील कार्ल्सरुह येथे झालेल्या ‘इंडियन समर डेज फेस्टीव्हल २०१९’ मध्ये महाराष्ट्राच्या चमूने सहभागी होत विविध कला आणि संस्कृतींचे सादरीकरण केले. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांचा विविध उपक्रमांद्वारे या महोत्सवात मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला. महाराष्ट्रातील पाककृतींचा आस्वाद घेत जर्मन नागरीकांनी महाराष्ट्राच्या वैविध्याविषयी जाणून घेण्यात मोठा रस दाखवला.

जर्मनीतील पर्यटनप्रेमींना भारताविषयी असलेली आस्था आणि भारतभेटीबद्दल विशेषत: महाराष्ट्राबद्दल असलेली उत्सुकता लक्षात घेता महाराष्ट्राने रोड शो, प्रदर्शन, व्हीडीओ अशा विविध माध्यमांसह मोठ्या प्रमाणात भाग घेतल्यास आणि जर्मनीतील विविध शहरे आणि विभागांत महाराष्ट्राविषयी माहिती पोहोचविल्यास त्याचा चांगला लाभ होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया जर्मनीतील पर्यटन व्यावसायिकांनी यावेळी व्यक्त केली.      

            इंडिया समर डेज या वार्षिक महोत्सवाचे आयोजन KEG Karlsruhe Event Gmbh व भारतीय दूतावास कार्यालय, मुनीच यांच्या सहकार्याने दरवर्षी कार्ल्सरुह, जर्मनी येथे करण्यात येते. महाराष्ट्र शासन व बार्डन बुटन (जर्मनीतील राज्य) या राज्यादरम्यान पर्यटन व विविध क्षेत्रांच्या विषयांशी निगडीत सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील पर्यटनस्थळे, कला, संस्कृती व पाककृती यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनात्मक प्रसिध्दी करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग हा 2017 पासून सातत्याने या कार्यक्रमात सहभागी होत आहे.

यंदाचा महोत्सव हा दि. 13 व 14 जुलै, 2019 रोजी आयोजित करण्यात आला होता. नेहमीच्या प्रथेनुसार यावर्षी देखील राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत या महोत्सवात महाराष्ट्र दालन उभारुन सहभाग घेण्यात आला. महोत्सवात महाराष्ट्रातील समुद्र किनारे, वन्य पर्यटन, साहसी पर्यटन, धार्मिक पर्यटनस्थळे, ऐतिहासिक पर्यटनस्थळे, जागतिक वारसा स्थळे, पारंपारिक सण (गुढीपाडवा), महाराष्ट्रातील पारंपारिक हस्तकला (पैठणी),पारंपारिक वेशभूषा (पगडी, फेटे, गांधी टोपी, जिरेटोप) व महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ, पारंपरिक नृत्ये यांचे प्रदर्शन करण्यात आले. महोत्सवात जर्मन व भारतीय पर्यटकांनी महाराष्ट्र दालनाला मोठ्या संख्येने भेटी देऊन महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे, कला-संस्कृतींची ओळख करुन घेतली व खाद्यपदार्थांचा आस्वादही घेतला.

महाराष्ट्र दालनाला भेट देणाऱ्या जर्मन पर्यटकांचे पारंपारिक पध्दतीने फेटे बांधून स्वागत करण्यात आले. महिला व पुरुष पर्यटकांनी पारंपारिक महाराष्ट्रीयन वेशभूषा करुन सेल्फी काढून घेतले. दोन दिवसीय महोत्सवात स्थानिक जर्मन तसेच विदेशी पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला.