Home ताज्या बातम्या युरेनियम प्रकरणाचे धागेदोरे झारखंडमध्ये

युरेनियम प्रकरणाचे धागेदोरे झारखंडमध्ये

0
युरेनियम प्रकरणाचे धागेदोरे झारखंडमध्ये

‌म. टा. प्रतिनिधी, मुंबईः मुंबईत युरेनियम सापडल्याच्या प्रकरणाचे धागेदोरे झारखंडपर्यंत गेले असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी झारखंड पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. त्यासंबंधी तपासासाठी एनआयएचे पथक तिकडे रवाना होणार आहे.

मुंबईत एप्रिलमध्ये एका भंगार दुकानात युरेनियम सापडले होते. युरेनियम हा अणू स्फोटकांमधील अत्यावश्यक घटक असून, ते संरक्षित श्रेणीत आहे. त्याचा सार्वजनिक, तसेच व्यावसायिक वापर करण्यावर बंदी आहे. त्यामुळेच मुंबईत हे युरेनियम सापडल्यानंतर त्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्यात आला. भंगारात सापडलेल्या या स्फोटकांचे धागेदोरे झारखंडपर्यंत गेल्याचे आढळून आले आहे.

‘एनआयए’मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंड पोलिसांनी बोकारो येथे युरेनियमचा ६.४० किलो साठा दोन दिवसांपूर्वी जप्त केला. त्या प्रकरणी सात जणांना अटक झाली आहे. हा साठा शुद्ध युरेनियम स्वरूपातील नसून, खनिज स्वरूपातील आहे. अमेरिकेत ते तयार झाल्याचे झारखंड पोलिसांनी सांगितले. मुंबईत सापडलेले युरेनियमदेखील अमेरिकेतच तयार झाले होते. त्यामुळेच मुंबईतील साठ्याचा संबंध झारखंडशी असल्याचा अंदाज आहे. त्याबाबत तपासासाठी ‘एनआयए’चे पथक तिकडे रवाना झाले आहे.

झारखंड पोलिसांनी केलेल्या तपासात अनिल सिंह नावाची व्यक्ती युरेनियम पुरवत असल्याची माहिती समोर आली असून, त्याला अटक झाली आहे. पण, या प्रकरणी मुन्ना ऊर्फ इशाक हा फरार आहे. इशाक हा देशात अनेक ठिकाणी युरेनियम पुरवतो, अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. त्यामुळेच हे प्रकरण मुंबईतील युरेनियमचा तपास करणाऱ्या ‘एनआयए’च्या पथकाने स्वत:कडे घेतले आहे.

Source link